मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी फडणवीस यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी आदल्या दिवशी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधीच्या निमंत्रणासाठी फोन केला होता. नियम आणि संकेतानुसार, विरोधी पक्षालाही शपथविधीचे निमंत्रण द्यावे लागते. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, काय चर्चा झाली?
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांना फोन केला होता. संसदेचे हिवाळी अधिवेशन असल्याने येऊ शकणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. पण त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांनाही शपथविधीसाठी फोन केला होता. आम्हा दोघांमध्ये चांगले बोलणे झाले. त्यांनी माझे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. तसेच विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करू, असे सांगत सत्ताधारी पक्षाचे सहकार्यही विरोधकांना असू द्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली, असे फडणवीस यांनी सांगितले.
विरोधी पक्षांचे नेते शपथविधीला आले असते तर मला अधिक आनंद झाला असता
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते शपथविधीला आले असते तर मला अधिक आनंद झाला असता, असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर २०१९ ला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला मी गेलो होतो, असे आवर्जून फडणवीस यांनी नमूद केले. राजकारणातील कटुतेमुळे विरोधक आले नाहीत का? असे विचारले असता, मला असे वाटत नाही. काही वेळा लोक येतात, काही वेळ येत नाहीत, असो... असे फडणवीस म्हणाले.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा विरोधकांनी आवर्जून शपथविधीला उपस्थिती लावली होती. मात्र यंदा विरोधकांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.