'अल्लाह' म्हटल्यानं तीन लहान मुलांना मारहाण, जबरदस्तीने द्यायला लावले 'जय श्री राम'चे नारे
मध्य प्रदेशातील रतलाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे अल्लाह म्हटल्यामुळे तीन मुलांना अनेक थप्पड मारण्यात आल्या. मारहाण करणाऱ्या तरुणाने मुलांना जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. मुले जोपर्यंत जय श्रीराम म्हणत नाहीत, तोपर्यंत तरुण त्यांना मारत राहिला. मुले रडत राहिली पण तरुण त्यांना मारायचा थांबला नाही. थप्पड मारूनही त्याचे मन भरले नाही. त्याने चप्पल काढून मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
लहान मुलांना मारहाण केल्याचे हे प्रकरण मध्य प्रदेशातीर रतलाम येथे घडले असून एक महिना जुने असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या व्यक्तीने मारहाण केलेल्या तीन मुलांमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. इतर दोघांचे वय ११ आणि १३ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी त्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी तिन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी माणक चौक पोलिस ठाणे गाठून आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. रतलामचे अतिरिक्त एसपी राकेश खाका म्हणाले, मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सुमारे महिनाभर जुना असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सायबर पथकाला तपास करून आरोपींचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
या घटनेची सुरुवात सिगारेट ओढण्यापासून झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मुलांना थप्पड मारतो आणि विचारतो की सिगारेट ओढणार का? मग एक मुलगा वेदनेने ओरडू लागतो आणि 'अल्लाह' म्हणू लागतो. तो माणूस विचारतो, तू अल्लाह काय म्हणालास आणि मग पुन्हा थप्पड मारायला लागतो. आरोपी त्यांना जय श्रीराम म्हणायला लागतो आणि मुलं जय श्रीराम म्हणेपर्यंत तो थप्पड मारतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीवर अश्लील कृत्य, इजा करणे, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे, धमकावणे आणि धर्म, द्वेषाच्या आधारावर वैमनस्य वाढविणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून तणावाचे वातावरण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.