ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठ्या मनाने महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला तर त्याचा महायुतीलाच फायदा होईल. ज्या दिवशी शरद पवार भाजपसोबत येतील, त्याच दिवशी महाविकस आघाडीला आपला घाशा गुंडाळावा लागेल.
कारण, महाविकास आघाडीचे तारू हे केवळ सध्या शरद पवार यांच्या नावावर शिल्लक आहेत, असे भाकित शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. सांगोल्यात माध्यमाशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत आणि जनतेच्या न्यायालयातही अजित पवार यांचाच ठरला आहे. त्यामुळे मोठे पवार महायुतीसोबत आले तर त्याचा फायदाच होईल. तोटा तर होणारच नाही.
एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमची आणि राज्यातील जनतेची इच्छा होती. पण, भाजप आमदारांचा रेटा आणि आकड्यांचा खेळ यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असावेत. पण, शिंदे हे कोणत्या खुर्चीवर बसले आहेत, याला महत्व नाही. कारण गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले कष्ट, जनतेचे सोडवलेले प्रश्न, माझ्याच तालुक्यात एकही शेतकरी ज्याला जळिताचे पैसे भेटले नाहीत, असा नाही. एकही सातबारा तसा मिळाला तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे हे लोकनेते झाले आहेत. त्यामुळे ते कुठल्याही खुर्चीवर बसले तरी प्रभावीपणे काम करतील, असा दावाही शहाजीबापूंनी केला.
ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दरबारातील एक वजनदार नेते आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा दबदबा कोणीच पुसून काढू शकत नाही. कारण राज्यातील जनता शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. निकालाच्या दिवसापासून मी पक्षाचे काम करत आहे. मला काय द्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा असणार आहे. पक्षीय असो शासकीय पातळीवरील असो, जी कोणती संधी एकनाथ शिंदे मला देतील, त्या संधीचे मी सोने करून दाखवीन. मी शिंदे यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, अशी कबुलीही माजी आमदार पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ज्यांनी ईव्हीएम आणली, त्या काँग्रेस पक्षानेच आता ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पण आतापर्यंत ईव्हीएमवर शेकडो निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम आणतानाच विचार कराला पाहिजे होता. आतापर्यंत ईव्हीएमच्या विरोधात एवढ्या कडक तक्रारी झालेल्या नाहीत, त्या आजच काय होत आहेत. दारुण पराभवामुळे विरोधकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बाहेर रस्त्यावर राजकारणात कसं यायचं म्हणून विरोधकांनी शोधलेला हा मार्ग आहे. संजय राऊत हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका राष्ट्रहिताचा आहे. जनतेचा आणि प्रशासकीय वेळेचा अपव्यय आहे. पैशाचा तिजोरीवर पडणारा या सर्व गोष्टींचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे.निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, ईव्हीएम घ्या अथवा आणखी संशोधन करून कशावर घ्यायची त्यावर घ्या. संजय राऊत तुमचं घर एवढं भूईसपाट झाले आहे की तुम्ही त्यातील पत्रं, विटा गोळा करून झोपडं बांधा. संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडं करून टाकले आणि आता उरलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वाटुळं केल्याशिवाय संजय राऊत काही राहत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.