कोल्हापूर : चाफोडी तारळे (ता. राधानगरी) येथे कौटुंबिक वादातून मंगल पांडुरंग चरापले (वय ४२) यांचा पतीने गळा आवळून आणि भिंतीवर डोके आपटून खून केला. ही घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास चाफोडी येथील राहत्या घरात घडली. याबाबत राधानगरी पोलिसांनी संशयित हल्लेखोर पांडुरंग चरापले (वय ४८) याला ताब्यात घेतले.
सीपीआरच्या पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, चाफोडी येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चरापले दाम्पत्यास एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी इंजिनिअर असून, ती सध्या पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी करते, तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पांडुरंग आणि मंगल यांच्यात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग उद्भवत होते.
सोमवारी सायंकाळी दोघेच घरी असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून पांडुरंग याने पत्नीचा गळा आवळून भिंतीवर डोके आपटले. या घटनेत मंगल गंभीर जखमी झाल्या. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मंगल यांना गावातील रुग्णालयात दाखल करून त्यांच्या माहेरच्या नातेवाइकांना बोलवून घेतले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये पोहोचताच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, पांडुरंग यांनी पत्नीला मारल्याची कबुली दिल्याने राधानगरी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
माळ्यावरून पडल्याचा बनाव
पांडुरंग याने पत्नीला बाहेरच्या खोलीत आणून ठेवले होते. शेजाऱ्यांनी विचारणा केली असता, ती माळ्यावरून पडल्याचे त्याने सांगितले. मात्र, गळा दाबल्याचे व्रण पाहून मंगल यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी विचारणा केल्यानंतर पतीने खुनाची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
सगळे सुरळीत, तरीही विपरीत
पती-पत्नीमधील किरकोळ वाद वगळता चरापले कुटुंबाचे सगळे सुरळीत सुरू होते. इंजिनिअर मुलगी नोकरी करते. मुलगाही चांगले शिक्षण घेत आहे. अचानक घडलेल्या घटनेत मुलांची आई जीवानिशी गेली, तर बाप कोठडीत गेला. त्यामुळे दोन्ही मुले पोरकी झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.