नागज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घोरपडी फाट्याजवळ (ता. कवठेमहांकाळ) भरधाव मोटारीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सुनीता ऊर्फ हौसाताई संजय कल्याणी (वय 55, रा. चिपरी, ता. शिरोळ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारीतील अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी तीन वाजता घडली.
जखमींमध्ये सुशिला बाबासाहेब वाडकर (वय 65), अमोल बाबासाहेब वाडकर (32, दोघेही रा. जयसिंगपूर) व नीमा अतुल पोगले (44, रा. सांगली) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता, की टायर फुटल्यानंतर मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत गेली. अपघातात मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अमोल वाडकर हे नातेवाईकांसह मोटारीतून (क्र. एमएच 10 बीए 7585) रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीहून सोलापूरला निघाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ अचानक त्यांच्या मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे वेगात असलेली मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली.
या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर मोटारीतील सुशिला वाडकर, अमोल वाडकर, नीमा पोगले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सुरू आहे.
घटनास्थळी विदारक चित्र
घटनास्थळी विदारक चित्र होते. अपघातात मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. मृतांचे व जखमींचे कपडे, चप्पल, चिरमुरे, फरसाणा, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या आदी साहित्य बाजूच्या दगडांमध्ये, झाडीत विस्कटले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.