सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समजले; तीन वर्षांनी संसदेत रिपोर्ट सादर
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. या अपघाताचे कारण आता तीन वर्षांनी समोर आले आहे. संसदेत रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा रिपोर्ट सादर करण्यात आला. यानुसार मानवी चुकांमुळे ही हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आठ डिसेंबर २०२१ मध्ये एमआय-१७ व्ही ५ या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. तामिळनाडूच्या कुन्नूजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. संसदेत संरक्षण संबंधी स्थायी समितीने १३ व्या संरक्षण योजनेच्या काळातील भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या अपघाताशी संबंधीत आकडे जाहीर केले. यामध्ये ३४ अपघात झाल्याचे म्हटले आहे.
हे अपघात मानवी चूक असे म्हणण्यात आले आहेत. या अहवालात ३३ वी दुर्घटना ही रावत यांच्या हेलिकॉप्टरची आहे. याचे नाव एमआय १७ असे देण्यात आले असून तारीख रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची आहे. यामध्ये मानवी चूक (एअर क्रू) असे नोंदविण्यात आले आहे. या सर्व अपघातांची चौकशी पूर्ण करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
भारतीय वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जाण्यात निघाले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 सशस्त्र दलाचे कर्मचारी या विमानात होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातानंतर शौर्य चक्र पुरस्कार विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. परंतू त्यांचा अपघाताच्या आठवडाभरानंतर मृत्यू झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.