विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यात सहकार्य केले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षाकडे हा निर्णय घेण्यास सोपवले होते. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका आणि मूळ पक्ष आणि चिन्ह वाद सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. याच मुद्द्यांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली.
धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल चव्हाण काय बोलले?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "चंद्रचूड यांना लोकशाही बळकट करण्याची संधी असताना त्यांनी अत्यंत सुवर्णसंधी गमावली. मला वाटतं की, आता ते माजी सरन्यायाधीश आहेत. आम्हाला त्यांचा आदर आहे. त्यामुळे फार जास्त बोलत नाही. कारण चुकून जास्त शब्द जाईल. काय बोलावं मला माहित नाही. खरं म्हणजे त्यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केलं", अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर केली.
'आक्रस्ताळेपणा का सुरूये', भाजपचे उत्तर
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, "का एवढा आक्रस्ताळेपणा यांचा सुरू आहे, मला कळत नाही. पराभव तर या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक पक्षांचे, अनेक नेत्यांचे झाले आहेत. पण, एवढा जिव्हारी घाव लागलाय की, न्यायमूर्तीवर पण आरोप तोही लोकशाहीचा खून केल्याचा करणे हे जरा अतिच होत आहे", असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर पलटवार केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.