भारतीय संघाचा स्टार ऑल राउंडर आणि मॅच विनर अशी ओळख असलेल्या आर. अश्विन याने अनपेक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर रोहित शर्मासोबत प्रेस कॉन्फरन्समध्ये आर. अश्विनही आला. माझ्या जागी इथं आकाशदीप किंवा जसप्रीत बुमराह असायला हवा होता. पण मी एका खास कारणासाठी रोहितसोबत आलोय, असे सांगत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. ही घोषणा केल्यावर तो तिथून निघून गेला. मालिकेतील दोन सामने शिल्लक असताना अचानक त्याने घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करुन सोडणारा आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन याला बाकावरच बसावे लागले होते. पिंक बॉल कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या सामन्यात त्याने १८ षटके गोलंदाजी करताना एक विकेट घेतली. याशिवाय पहिल्या डावात २२ आणि दुसऱ्या डावात ७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली होती. उर्वरित दोन्ही सामन्यात संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने हा निर्णय घेतला का? हे अश्विनच सांगू शकतो. पण त्याचा हा निर्णय समजण्यापलिकडचा आहे.
आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
ऑफ स्पिनर अश्विननं भारताकडून एकूण २८७ सामने खेळले आहेत. यात १०६ कसोटी सामन्यातील २०० डावात त्यानं ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. यात ३७ वेळा त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवलाय. याशिवाय आठ वेळा त्याने १० विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ५९ धावा खर्च करून ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ११६ वनडेत त्याने १५६ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये ६५ सामन्यात त्याच्या खात्यात ७२ विकेट्स जमा आहेत.
बॅटिंगमध्येही सोडलीये खास छाप
अश्विननं फक्त गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही खास छाप सोडली आहे. कसोटीतील १५१ डावात त्याच्या खात्यात ३५०३ धावांची नोंद आहे. ज्यात त्याने ६ शतकासह १४ अर्धशतकांचा समावेश आहे. १२४ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. वनडेत त्याने ६३ डावात ७०७ धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेस आहे. टी-२० मध्ये त्याच्या खात्यात १८४ धावा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.