महाराष्ट्राची मर्लिन मनरो व सौंदर्याचा आयटम बॉम्ब या उपाध्या ऐकल्या कि सर्वात पाहिला ज्यांचा चेहरा समोर येतो त्या म्हणजे अभिनेत्री पद्मा चव्हाण. लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी हे किताब दिले होते.
निखळ सौंदर्याचा झरा असलेल्या पद्मा चव्हाण यांनी मराठी चित्रपट तसेच नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. त्या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी चंदेरी दुनियेत पदार्पण केले. पण त्यांच्या सोबतच्या अफेअरमुळे एका व्यक्तीला रस्त्यावर यावे लागले होते.
वयाच्या १५व्या वर्षी केले पदार्पण
भाव बदलणारा सुरेख चेहरा, बोलके डोळे तसेच अभिनेत्रीला आवश्यक असणारे आकर्षक व्यक्तिमत्व हे पद्मा यांच्याकडे होते. म्हणूनच की काय त्यांना पडद्यावर काम करण्यासाठी जास्त वेळ स्ट्रगल करावा लागला नाही. १९५९ साली वयाच्या १५व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा सिनेमात पद्मा यांना काम मिळाले आणि त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
जवळपास २८ सिनेमांमध्ये केले काम
नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, माझी बायको माझी मेव्हणी मधील रसिका, लग्नाची बेदी मधील रश्मी अशा त्यांच्या बऱ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या. १९६६ साली दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत पद्मा यांचे लग्न झाले. पद्मा यांनी आकाशगंगा, अवघाची संसार, जोतीबाचा नवस, संगत जडली तुझी न माझी, बोट लावीन तिथे गुदगुल्या, लाखात अशी देखणी सारख्या सुमारे २८ मराठी चित्रपट केले.
बॉलिवूडमध्येही केले काम
मराठी सिनेइंडस्ट्रीसोबतच पद्मा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बऱ्याच निगेटिव्ह भूमिका केल्या. हिंदीत आदमी, बिन बादल बरसात तर कश्मीर की कलीमध्ये त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत काम केले. मराठीत या सुखांनो या, आराम हराम है या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. या काळात त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीच्या यशाच्या शिखरावर होत्या.
प्रियकराविरोधात कोर्टात खटला
पद्मा चव्हाण या चित्रपटातून जशा बिनधास्त भूमिका साकारत तशा त्या खाजगी आयुष्यात देखील तेवढ्याच बिनधास्तपणे वावरत असत. पुढे जाऊन बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी त्यांचे संबंध जुळले होते असे म्हटले जाते. चंद्रकांत खोत यांनी पद्मा चव्हाण यांच्यासोबत लग्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र कालांतराने त्यांच्यात काहीतरी वाद झाला जो इतका विकोपाला गेला की पद्मा चव्हाण यांनी खोतांविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला. त्यावेळी कोर्टात त्यांचा हा खटला १० ते ११ वर्षे रखडला. दुर्दैवाने १२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.