विधवा महिलांना दरमहा मिळणार 4 हजार रुपये
पणजी : मुक्तिदिनाचे औचित्य साधून राज्यातील विधवा महिलांना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या या योजनेत आता विधवा महिलांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
यापूर्वी विधवांना सरकारतर्फे 2500 रुपये मिळत होते. मात्र, यामध्ये 1500 रुपयांची वाढ करून आता 21 वर्षांखालील वयाचे मूल असलेल्या विधवा महिलांना 4 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये जर महिलेच्या मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल तर 2500 रुपये मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे, महिलेचे वय 60 वर्षांहून अधिक असेल तर तिलाही या नवीन वाढीचा लाभ घेता येणार नाही.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी पात्र विधवा, महिला आणि बाल विकास संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या 'गृह आधार' योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. दरम्यान, समाजकल्याण विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेंतर्गत 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.