कर्जबाजारीपणाला कंटाळून पती-पत्नीने गळफास लावून घेऊन स्वत:ला संपवलं आहे. पंकज गुप्ता आणि रीना गुप्ता अशी आयुष्य संपवलेल्या दोघांची नावं आहेत. 18 डिसेंबरला ही घटना घडली आहे.
मृत पंकज आणि रीना यांच्यावर कर्ज होते. हे कर्ज वसुलीसाठी येणाऱ्यांकडून त्याना वारंवार धमकावलं जात असल्याने ते दोघंही त्रस्त झाले होते. अखेर दोघांनी भयंकर पाऊल उचललं. दोघांचे मृतदेह एकाच घरात वेगवेगळ्या रूममध्ये पंख्याला लटकलेले होते. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी भेट दिली असता त्यांना घटनास्थळावरून 11 पानी नोट सापडली आहे. त्यात मयत दाम्पत्याने कर्ज आणि जीवन संपवण्याचं कारण लिहिलं होतं. दिल्लीजवळच्या गाझियाबाद भागात शालिमारनगरमध्ये ही घटना घडली आहे.
नोटमध्ये नेमकं काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 पानांच्या नोटमध्ये 10 पानं पंकज यांनी आणि शेवटचं पान पत्नी रीना यांनी लिहिलंय. पंकज यांनी लिहिलं आहे की, 'मी माझ्या मित्रासोबत एक क्लब उघडला होता. पण मित्राने फसवणूक केली आणि माझ्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. जेव्हा मी मित्राकडे अनेकवेळा पैसे मागितले, तेव्हा त्याचा दिल्ली पोलिसांत हवालदार असणारा मामा मला धमकी देत होता. तसेच मी ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो, तो मणिपूरमधील एका व्यक्तीचा आहे. मी 2018 मध्ये डीलरच्या मदतीने 5 लाख रुपयांना भाडेतत्त्वावर तो घेतला होता.'
घर सोडण्यासाठीही येत होती धमकी
पंकज यांनी सुसाईड नोटमध्ये पुढं म्हटलं आहे की, 'हे घर डीलरकडून विकत घेण्याबाबत माझी चर्चा होत होती. पण कोरोनाच्या काळात डीलरचा मृत्यू झाल्याने मी घर खरेदी करू शकलो नाही. आता घरमालकाची मुलगी मला घर सोडण्यासाठी रोज त्रास देत आहे. एकदा ती मला दिल्लीतल्या पोलीस ठाण्यात घेऊन गेली. तेथे मला धमकावण्यात आले. तेथील एका पोलिसानं माझ्याकडून प्रकरण मिटवण्यासाठी 40 हजार रुपये घेतले. तसेच घरमालकाच्या मुलीला 1 लाख 40 हजार रुपयांचा चेक दिला. घरमालकाच्या मुलीने मला घर रिकामे करण्याची धमकी दिली. ती तिचा एक नातेवाईक आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर असून त्याला फोन करून त्याच्या नावाने मला धमकावत होती. माझ्या घरी पोलीस देखील पाठवत होती.' तर, 'आम्हाला मरायचे नव्हते. आम्ही पैसे देण्यासाठी काही वेळ मागत होतो. पण पैसे मागणारे आम्हाला त्रास देत होते. त्यामुळे आता कोणताही पर्याय उरला नाही.' असे पत्नी रीनानं नोटच्या शेवटच्या पानावर लिहिले होते.
सर्वात प्रथम भावाने पाहिले मृतदेह
पंकज आणि रीना दोघेही घटस्फोटित होते. या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं होतं. पंकज यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. तो 12 वर्षांचा असून मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. तो दिवसभर आजोबांसोबत दुसऱ्या घरी राहतो. पंकज यांच्या भावाला सर्वात प्रथम घटनेची माहिती मिळाली, त्यामुळे तो सर्वात प्रथम घटनास्थळी पोहोचला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत गेल्यावर त्याला पंकज आणि रीना यांचे मृतदेह लटकताना दिसले. हे पाहून तो किंचाळला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.