अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मोस्ट वॉण्टेड असलेला शुभम लोणकर हा लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील काही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तपासामध्ये श्रद्धा वाळकर प्रकरणाशी बिष्णोई गँगशी असलेल्या संबंधाचा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता श्रद्धा वाळकर प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला असल्याचं तपासात समोर आलं आहे.
अकोला पोलीस कनेक्शन
बाबा सिद्धीकींच्या हत्येप्रकरणी पोलीस माहिती गोळा करत आहेत. त्याचवेळी आरोपी शुभम लोणकरसंदर्भात माहिती गोळा करताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 24 संक्षयितांना अटक केली आहे. यामध्ये झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघेही फरार आहेत. शुभम लोणकरला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचे जिकरीचे प्रयत्न सुरु आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये अकोला पोलिसांनी शुभमन लोणकरला शास्रास्र कायद्याअंतर्गत अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी शुभम लोणकरकडून तीन हत्यारं ताब्यात घेतली होती. अकोला पोलिसांनी या घटनेचा संदर्भ देत शुभम लोणकरचे बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अमोल बिष्णोईच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हत्यांच्या तस्करीमधील हत्यारेच शुभम लोणकरकडे सापडल्याचं सांगितलं जात आहे.
व्हॉट्सअप मेसेज
पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकरने अमोल बिष्णोईशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. व्हॉट्सअप बिझनेस अकाऊंटवरुन शुभम लोणकरने अमोल बिष्णोईला मेसेज केला होता. यावरुनच शुभम लोणकर हा बिष्णोई टोळीसाठी काम करत असल्याचं स्पष्ट होत असून या टोळीच्या निशाण्यावर आता श्रद्धा वालकर प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
श्रद्धा वालकर प्रकरण काय?
2022 साली मे महिन्यामध्ये वसईमधील श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तिचा बॉयफ्रेण्ड आफताब पुनावाने तुकडे केले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये हा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली होती. आफताब सध्या तिहार तुरुंगामध्ये आहे. या प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. देशभरातून या प्रकरणी रोष व्यक्त करण्यात आलेला.
सध्या कुठे आहे आफताब?
तिहार तुरुंगात असलेल्या आफताब हा सध्या बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर आहे. या माहितीनंतर महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. बिष्णोई टोळीचा मोहऱ्क्या लॉरेन्स बिष्णोई अनेकदा तुरुंगातूनच सूत्र हाताळत असल्याने तुरुंगात असेलला आफताबही सुरक्षित नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.