मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील जिल्हा पंचायतीमधील आयएएस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन राज यांना मिठाईच्या बॉक्समध्ये लाच देणं एका नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. जिल्हा पंचायत सीईओंनी एसपींना सूचना देऊन मिठाईच्या बॉक्ससह लिफाफा देणाऱ्या दोन नेत्यांना पोलीस ठाण्यात पाठवलं.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन राज हे विभागीय कामकाज सांभाळत होते. यात दरम्यान, सिधी जिल्ह्यातील रघुनाथपूर गावात सरपंचपदाची निवडणूक लढवलेले विनोद त्रिपाठी आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य मिठाईचा बॉक्स आणि प्रत्येकी एक अर्ज घेऊन सीईओ कार्यालयात पोहोचले.सीईओंनी अर्जासोबत मिठाईचा बॉक्स आणि एक लिफाफा पाहिल्यानंतर त्या लिफाफ्यात काय आहे, अशी विचारणा केली. मिठाईच्या बॉक्ससह लाचेची माहिती सीईओंना मिळताच त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना या दोन्ही नेत्यांना बाहेर बसवण्यास सांगितलं.
सीईओंनी तत्काळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र वर्मा यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांना काही समजण्यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून लिफाफा देणारा नेता विनोद त्रिपाठी याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य या प्रकरणाने घाबरले.
जिल्हा पंचायत सीईओंच्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी जिल्हा पंचायत सदस्याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. दोन्ही नेत्यांच्या अटकेला दुजोरा मिळालेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.