बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. रविवारी(३ नोव्हेंबर) अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६८ वर्षांच्या होत्या.
प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, अद्याप त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.
हेलेना ल्यूक यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवलं होतं. आओ प्यार करे, दो गुलाब, साथ साथ अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या मर्द या सिनेमात त्या झळकल्या होत्या. या सिनेमामुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. हेलेना यांनी १९७९ साली मिथुन चक्रवर्तींशी लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत घटस्फोट होत त्यांचा संसार मोडला.
मिथुन चक्रवर्तींशी घटस्फोटानंतर हेलेना यांना फार चांगले बॉलिवूड सिनेमे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी सिनेइंडस्ट्री सोडून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत त्या फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायच्या. एका मुलाखतीत त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं होतं. लग्नानंतर खूश नसल्यामुळे घटस्फोट घेत वेगळं झाल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी योगिता बाली यांच्याबरोबर लग्न केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.