कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेमध्ये सचिव अनिल भाऊसो पोवार (मयत, रा. टाकवडे, ता. शिरोळ) यांनी गैरव्यवहार करून ३७ लाख ८९ हजार ९९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे पोवार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सोहेल बाणदार व सर्व संचालक असे एकूण १३ जणांविरोधात लेखापरीक्षक सागर सदाशिव सुतार (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिल्याने सहकारात खळबळ उडाली आहे.२०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले असून, याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष बाणदार, संचालक भाऊसो चौधरी, महावीर नारगुडे व समीर मुजावर अशा चौघांना अटक केली आहे. उर्वरित संचालक फरार आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अध्यक्ष बाणदार यांच्यासह भाऊसो चौधरी, धोंडीराम नागणे, देवगोंडा पाटील, सतीश अडगाणे, विकास तणपुरे, महावीर नारगुडे, आनंदा चौगुले, अरुण ऐनापुरे, समीर मुजावर, एकनाथ कांबळे, वर्षा गुरवान यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मी विकास संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेवर बाणदार गटाची सत्ता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संस्थेत अपहाराची चर्चा होती. संस्थेचे सचिव अनिल पोवार यांनी काही महिन्यांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अपहाराच्या चर्चेला ऊत आला होता.
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक सुतार यांनी संस्थेचे नुकतेच लेखापरीक्षण केले असून सचिव पोवार यांनी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या सालात सभासदांनी कर्जाची भरलेली रक्कम संस्थेत जमा न करता २७ लाख २ हजार ९९ रुपये, जमीन खरेदीपोटी मंजुरीविना १० लाख रुपये व संस्थेमध्ये अनामत रक्कम नसताना रोख ८७ हजार रुपये असे एकूण ३७ लाख ८९ हजार ९९ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या अपहाराला जबाबदार धरून अध्यक्षासह सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.