Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकचा पाठलाग; पोलिसांच्या वाहनांना धडक, ट्रकने पेट घेतल्याने १५ जनावर जळून खाक

गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकचा पाठलाग; पोलिसांच्या वाहनांना धडक, ट्रकने पेट घेतल्याने १५ जनावर जळून खाक
 

वर्धा : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पोलिसांकडून पाठलाग करण्यात येत होता. मात्र भरधाव ट्रकने समृद्धी महामार्गावरील येळाकेळी इंटरचेंच परिसरात पोलिसांच्या दोन शासकीय वाहनांना धडक दिली.

भरधाव ट्रक समृद्धी महामार्गाने पुलगाव हद्दीत पोहचताच ट्रकमध्ये अचानक स्पार्क होऊन ट्रकला आग लागली. यात ट्रकसह कोंबून ठेवलेल्या १५ जनावरांचा कोळसा झाला. ही थरारक घटना ३ रोजी मध्यरात्री ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडोरकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झाला. 

समृद्धी महामार्गावरून  जाणाऱ्या ट्रकमध्ये सुमारे ३० ते ३५ जनावरे कोंबून गिरड ते समुद्रपूर या मार्गाने अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. समुद्रपूर पोलिसांनी कर्मचाऱ्यासह ट्रकचा पाठलाग केला. पोलिस आपल्या मागावर असल्याचे चालकाला समजताच चालकाने ट्रक बुट्टीबोरी मार्गे समृद्धी महामार्गावर वायफड टोल नाक्यावरुन चढवत मुंबई कॉरिडोरने औरंगाबादकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबत समुद्रपूर पोलिसांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांना दिली. सेवाग्राम पोलिसांचे शासकीय वाहन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे शासकीय वाहन समुद्रपूर पोलिसांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी येळाकेळी परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर नाकाबंदी केली. 

मात्र, ट्रक चालकाने पोलिसांच्या या दोन्ही शासकीय वाहनांना धडक देत मुंबई कॉरिडोरने औरंगाबादकडे पळून गेला. मात्र पुलगाव हद्दीत प्रवेश करताच ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागली. दरम्यान चालकाने ट्रकखाली उतरत पळ काढला. काहीक्षणातच ट्रकने पेट घेतला. या आगीमुळे ट्रकसह ट्रकमधील १५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. इतर वाहने समृद्धी महामार्गावर सैरावैरा पळत सुटले. लगेच अपघातस्थळावर क्यूआरव्ही वर्धा, धामणगाव, नगरपालिका वर्धा येथील फायर रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांच्या दोन्ही वाहनातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला. अपघात झाल्यानंतर ट्रकने पेट घेतला. यात पोलिसांच्या शासकीय वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणाची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.