हरदोई : महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये घरगुती हिंसाचाराच्या केसेस अधिक असतात. महिलांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली जाते; पण महिला घरी, कुटुंबातही सुरक्षित नसतात.
एका महिलेनं याच कारणातून कॉन्स्टेबल नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिनं याआधीही नवऱ्याविरुद्ध एक तक्रार केली होती. आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची वेळ ओढवली. कॉन्स्टेबल पतीनं इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार करून त्यावरून स्वतःच्याच पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवले. त्या खात्याची चौकशी केली असता ते खातं महिलेच्या कॉन्स्टेबल पतीचंच असल्याचं लक्षात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल नवऱ्याला पत्नीच्या चारित्र्याविषयी शंका होती. त्याच संशयातून त्यानं इन्स्टाग्रामवर बनावट आयडीद्वारे खातं उघडलं. त्या खात्यावरून तो पत्नीला अश्लील मेसेज करू लागला. पत्नी त्याला उत्तर देईल असं त्याला वाटलं; मात्र पत्नीनं त्या मेसेजेसना उत्तर दिलं नाही. उलट पत्नीनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारच दाखल केली.
पत्नीनं 21 जून 2024 रोजी हरदोईमधल्या सायबर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. त्यात गौरव कुमार नावाच्या आयडीची व्यक्ती इन्स्टाग्रामवरून तिला अश्लील मेसेज पाठवत असल्याचं तिनं म्हटलं होतं. 'वहिनी तुम्ही खूप हॉट आहात' अशा पद्धतीचे मेसेज ती व्यक्ती पाठवत होती. तिच्याशी संबंध तयार करण्याचे प्रयत्न करत होती; मात्र आपण त्या व्यक्तीला ओळखतदेखील नाही. तसंच मेसेजला उत्तर देत नाही, तरीही तो मेसेज करतो असं महिलेनं म्हटलं होतं. त्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक करूनही त्यानं दुसऱ्या आयडीवरून तिला मेसेज करायला सुरुवात केली. त्याचा त्रास होत असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं.
महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केली असता तो इन्स्टाग्राम आयडी रायबरेली पोलीस लाइनमध्ये नोकरीला असलेल्या राकेशकुमार या कॉन्स्टेबलनं काढल्याचं लक्षात आलं. राकेशकुमार हा त्या महिलेचा पतीच आहे. महिला आणि तिच्या पतीमध्ये काही वाद सुरू असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. त्या वादांमुळेच पतीनं तिला बदनाम करण्यासाठी असे मेसेज पाठवल्याचं तिचं म्हणणं आहे.या प्रकरणातल्या महिलेनं पतीविरुद्ध याआधीही तक्रार केली होती. हुंड्याकरिता तो तिचा छळ करत होता अशी तिची तक्रार होती. आता महिलेनं पती अश्लील मेसेज करत असल्याची आणखी एक तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात राकेशकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्कल ऑफिसरनं दिले आहेत. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.