पुसद : महसूल विभागातील अव्वल कारकून व तलाठी यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता 'सहायक महसूल अधिकारी' व 'ग्राम महसूल अधिकारी' असे पदनाम करण्यात आले आहे. महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही.
त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर कामकाज करण्यात येते. या महसूल विभागातील काही पदांचे पदनाम बदलण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली होती.
यात अव्वल कारकून यांना कामकाजांचे नियंत्रण करताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधताना महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गास एक विशिष्ट पदनाम असणे आवश्यक आहे. त्यांना सहायक महसूल अधिकारी, असे पदनाम करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती.
तसेच कोतवाल यांना 'महसूल सेवक' करण्यात आले आहे. महसूल विभागातील कनिष्ठ लिपिकांचे पदनाम यापूर्वीच महसूल सहायक म्हणून बदलविण्यात आले होते. तर आता बदलण्यात आलेल्या पदनामामुळे तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपिक, अव्वल कारकून असे पदनाम दिसणार नाहीत.
महसूल विभागातील पदनाम बदल करण्याच्या मागणीला यश आले असून नुकताच शासनाने याबाबतचे शासन निर्णय काढले आहे. शासनाकडून पदनामात बदल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा कणा आहे. जिल्हाधिकारी व विभागीय स्तरावर कामकाज करण्यात येते. याच विभागाच्या माध्यमातून शासनाला महसूलदेखील मिळतो. सहायक महसूल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी या पदनामात बदल करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही अधिक मान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महसूल विभागात विविध मागण्या प्रलंबित
ग्रेड पे, जुनी पेन्शन आदी महत्त्वाच्या मागण्याही सोडविणे गरजेचे असून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यापैकी नुकताच तलाठी वर्गाची ग्राम महसूल अधिकारी, अव्वल कारकूनचे सहायक महसूल अधिकारी म्हणून पदनामात बदल करण्यात आला आहे. - दिलीप कोलेवाड, राज्य कार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र.
पदनामची झाली, ग्रेड पेची मागणी मान्य करा
ग्रेड पे व पदनाम बदलाबाबतची मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होती. शासनाने आता ग्राम महसूल अधिकारी पदनाम करून पदनामाची मागणी मान्य केली. अशीच ग्रेड-पेची मागणी मान्य करावी, अशी मागणी आहे. - आशिष जयसिंगपुरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, यवतमाळ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.