Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लाडक्या बहिणीं'बाबतचं विधान महाडिकांना चांगलंच भोवलं; निवडणूक आयोगानंतर भाजप खासदारांना दुसरा धक्का

'लाडक्या बहिणीं'बाबतचं विधान महाडिकांना चांगलंच भोवलं; निवडणूक आयोगानंतर भाजप खासदारांना दुसरा धक्का
 

विधानसभा निवडणूक अगदी दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे.सर्वच राजकीय पक्षांचा प्रचारही जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं आहे.त्यातच भाजप खासदार धनंजय महाडिक चांगलेच अडचणीत आले आहे. महाडिकांनी लाडक्या बहि‍णींबाबत केलेल्या वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यातच आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील सभेत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होते. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहे. विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर भाजप,महायुतीवर  टीकेसाठी आयते कोलीतच मिळाल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींबद्दलचं आक्षेपार्ह विधान भोवले आहे. भरारी पथकाने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मतदारांना धमकी वजा इशारा दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. महिलांनी आक्रमक होत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

 
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.या नोटिशीला 7 दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.याबाबत विरोधी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एका सभेत बोलताना काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत जी बहीण दिसेल, त्यांचे फोटो काढा. त्यांचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, अशा शब्दांत लाडक्या बहिणींना  एकप्रकारे दमच भरल्याने विरोधकांंसह सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय होतं महाडिकांचं वादग्रस्त विधान...?

धनंजय महाडिक सभेत म्हणाले होते, या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला पंधराशे रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या.घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय ? असा सवालही त्यांनी केला.

महाडिकांची दिलगिरी

लाडकी बहीण योजने संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखे काहीच मुद्दे राहिले नाहीत म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत. ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो असंही महाडिक म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.