दिवाळी सुरू झाली आहे. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
राजधानी दिल्लीसारख्या शहरांत प्रदूषणामुळे फटाक्यांवर बंदी आहे. बंदी असली तरी फटाके फुटणं मात्र अद्याप थांबलेलं नाही. शिवाय इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात फटाके फुटतात. फटाक्यांचा धूर आकाशात पसरत असतो. या फटाक्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. नेमके कोणत्या स्वरुपाचे दुष्परिणाम होतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणत्या घटकांचा काय होतो परिणाम?
फटाक्यांमध्ये अनेक प्रकारचे घातक घटक असतात. शिवाय त्याच्या धुरामुळं पसरणाऱ्या विषारी वायूंचाही शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालामध्ये फटाक्यांमधील घटक आणि त्यांचे दुष्परिणाम यांची माहिती दिली आहे.
शिसं - शिसं या घटकामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ते गरम होतं तेव्हा त्यातून विषारी वाफा येतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये गतिमंदत्व येतं किंवा मेंदूचं नुकसान होतं.
मॅग्नेशियम - मॅग्नेशियममुळे सुद्धा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तसंच त्यामुळे मेटल फ्युम फिव्हर नावाचा एक आजार होतो. त्याचे तुकडे त्वचेच्या आत गेले तर गॅस गँगरिन नावाचा रोग होतो.
जस्त (झिंक) - जस्त शरीराला हानिकारक नसलं तरी त्यातून निघणारी वाफ शरीराला हानिकारक असते.
सल्फर (SO4) - सल्फरमुळे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला इजा होते. त्यामुळे फुप्फुसांवर सूजही येऊ शकते.
नायट्रेट - हा अतिशय ज्वलनशील घटक आहे आणि त्यातून अतिशय विषारी वाफा येऊ शकतात. पोटात कळा येणं, गुंगी येणं, उलट्या, अशक्तपपणा या सर्व गोष्टी होऊ शकतात.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळं हवेतील कार्बन मोनोक्साइड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साइड इत्यादींचं हवेतलं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं.
गरोदर स्त्रिया, लहान मुलं आणि अस्थमाचे रुग्ण यांना या काळात सर्वाधिक त्रास होतो, असं अनेक संशोधनात आढळून आलं आहे.
हवेतील सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर्स (SPM) यांची पातळी वाढल्यामुळे घसा, नाक आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्धवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो.
ज्या लोकांना हृदयरोग, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थचे विकार असतात, तसेच सर्दी, खोकला, आणि ॲलर्जी असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो.
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखी एक मोठा धोका आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण नैसर्गिक स्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला 60 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल्स इतकी मर्यादा आखून दिलेली असते.
फटाक्यामुळे ही मर्यादा 140 डेसिबल्सपर्यंत जाते. 85 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजामुळं ऐकायला त्रास होतो. आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता, तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. वैजयंती गद्रे यांनी फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्या म्हणतात, "सध्या बाजारात विविध प्रकाराचे फटाके उपलब्ध आहेत. त्यातून विषारी गॅसेस बाहेर पडतात. त्यामुळे डोळ्याला खाज येणं, डोळे चुरचुरणं, डोळे कोरडे होणं असे परिणाम होतात.
रोषणाई किंवा आतषबाजी पहायला जाताना प्रोटेक्टिव्ह गॉगल घालावेत.
रोषणाईचे जे फटाके असतात, त्यानेही डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाक्यात पोटॅशिअम नायट्रेट, पोटॅशिअम क्लोरेट, सल्फर असे मुख्य पदार्थ असतात. त्यामुळे डोळ्यांना दुखापत होते.
जळलेला फटाका डोळ्यात गेला तर जखम होते. पापणीला चीर पडणे, पापणीची त्वचा फाटणे, बुबुळाला इजा होणं अशा जखमा होतात, अगदी डोळाही निकामी होऊ शकतो."
फटाक्यातून निघणाऱ्या लहान कणांमुळे फुप्फुसांनाही त्रास होतो. वेगवेगळ्या अॅलर्जी होऊ शकतात.
फटाक्यांमुळे दीर्घकाळाचा ब्राँकायटिस, अस्थमा, सायनुसायटिस, न्यूमोनिया आणि लॅरिंजायटिससारखे विकार उद्भवू शकतात.
मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील कान-नका-घसा तज्ज्ञ डॉ. शीतल राडिया म्हणाल्या, "फटाक्यांचा सर्व शरीरावर परिणाम होतोच, पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम कानावर होतो. कारण फटाक्यामुळे 140 डेसिबल्स इतका आवाज निर्माण होतो.
त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो किंवा कायमचा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. अनेक लोकांमध्ये मोठा आवाज ऐकल्यामुळे अचानक अस्वस्थता वाढलेली बघायला मिळते."
नाकावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "फटाक्यांमधील प्रदूषण करणाऱ्या घटकांमुळे नाक हुळहुळणं, खाजवणं असे प्रकार होतात. सायनसचा त्रास असलेल्या लोकांना फटाक्यांचा सर्वांत जास्त त्रास होतो.
फटाक्यामुळे जी रसायनं बाहेर पडतात त्यामुळे सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे सायनसचा त्रास वाढण्याची शक्यता असते."
फटाक्यातून निघणाऱ्या लहान कणांमुळे फुप्फुसांनाही त्रास होतो. वेगवेगळ्या अॅलर्जीज् होऊ शकतात. घशात जळजळ होते, घशात खाजवल्यासारखं होतं, खोकला होतो. असं त्या म्हणाल्या.
याबरोबरच डोळ्यांवरही त्याचा प्रचंड परिणाम होतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणं असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं डॉ. राडिया म्हणाल्या.
कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. ऑरपा काळेल यांनीही याबद्दल माहिती दिली. त्या म्हणतात, "85 डेसिबल्सपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज पाच मिनिटं ते एक तास इतक्या काळासाठी कानावर पडला तर तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा वाट्याला येतो.
फटाक्यांचा आवाज 150 ते 170 डेसिबल्स असतो. त्यामुळे तो आवाज अगदी एक मिनिट जरी आला तरी काय होईल याची कल्पना करा.
प्रदूषण भीषण आहेच. कारण फटाक्यात असलेलं सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, शिसं हे सगळं अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे.
फटाक्याच्या धुरामुळे अस्थमाचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यांना खोकला, सर्दी, धाप लागणं, असे प्रकार होतात."
मोठ्या आवाजामुळे गरोदर महिलांमध्येही तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवरही होऊ शकतो.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांमुळे हृदयविकाराचं आणि श्वसन रोगांचं प्रमाण वाढतं. तसंच हृदय आणि फुप्फुसांवर ताण वाढतो आणि शरीराला अधिकाधिक ऑक्सिजन मिळावा यासाठी या दोन्ही अवयवांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. श्वसन संस्थेतील पेशीचं नुकसान होतं.
याच संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, दिवाळीच्या काळात छातीत होणारी घरघर, श्वसनाचे विकार, ब्राँकायटिस सारख्या आजारांमध्ये सर्व वयोगटांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ होते.
भारतात फटाके उत्पादनाची स्थिती
कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी फटाके उडवण्याची परंपरा जुन्या काळापासून चालत आलेली आहे.
चीनमध्ये 10 व्या शतकापासूनच ही परंपरा सुरू झाली होती. भारतात ही पद्धत अरबांनी आणली होती. आताच्या काळाचा विचार कराचा झाल तर फटाक्यांचं उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
फटाक्यासाठी लागणारं साहित्य आणि पुरेसं मनुष्यबळ यामुळं भारतात विपुल प्रमाणात फटाक्यांचं उत्पादन होतं.
भारतातील लोकसंख्या वाढ आणि मध्यमवर्गीयांच्या आर्थिक स्थितीत सुधार यामुळे फटाक्यांच्या उत्पादनाचं आणि विक्रीचं प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती इंटरनॅशनल जर्नल ऑफ पॉलिसी सायन्सेस अँड लॉ या मासिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात आहे.
फटाक्यांचं उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
मात्र, फटाक्याचं उत्पादन भारतात योग्य पद्धतीने होत नाही. रसायनांची अयोग्य हाताळणी, फटाक्याची दारू भरताना प्रमाणापेक्षा जास्त भरणं, न वापरलेल्या रसायनांची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट यामुळे अनेक अपघात या कारखान्यांध्ये होत असतात.
तिथे होणारे बालकामगारांचे शोषण ही अनेक वर्षं न सुटलेली समस्या आहे. त्यामुळे फटाके तयार करतानाही आरोग्याच्या तेवढ्याच समस्या निर्माण होतात.
तामिळनाडूतील शिवकाशी ही फटाक्यांची राजधानी समजली जाते. भारतात तयार होणाऱ्या फटाक्यांपैकी 90 टक्के फटाके तिथे तयार होतात. त्यांची किंमत साधारण 800 ते 1000 कोटी इतकी असते.
फटाक्यांचे जवळजवळ 450 कारखाने या शहरात आहेत. 40 हजार लोक प्रत्यक्षपणे आणि 1 लाख लोक अप्रत्यक्षपणे या कारखान्यात काम करतात.
दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
फटाक्यांचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असेल तर घरी राहणं, दारं खिडक्या बंद करणं, हे सगळ्यात उत्तम आहे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. डॉ. ऑरपा यांच्या मते, मास्क घालून जाणं सगळ्यात उत्तम. तसंच इन्हेलर्सचा वापर करत रहावा, आणि दिलेली औषधं या काळात अजिबात बंद करू नयेत असा सल्ला त्या देतात.
कानाची काळजी घेण्यासाठी इअरबड्स, नॉइज कॅन्सलिंग हेडफोन वापरण्याचा सल्ला डॉ.राडिया देतात. जर एखाद्या व्यक्तीला ऐकूच आलं नाही, किंवा अस्वस्थ वाटलं, कानात आवाज येत असेल तर तातडीने डॉक्टरकडे जावं म्हणजे कमीत कमी नुकसान होईल.
घरात एअर प्युरिफायर लावावे. घशाचा त्रास कमी करण्यासाठी वाफ घ्यावी, गरम पाण्याने गुळणे करावेत. जास्तीत जास्ती पाणी प्यावं. त्यामुळे शरीरात गेलेले सगळे विषारी पदार्थ शरीरातून निघून जातील.
डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी फटाके खुल्या मैदानात उडवावेत. डोळ्याला पारदर्शक गॉगल लावावा. शक्यतो चांगल्या दर्जाचे फटाके उडवावेत.
बरेचदा असं होतं की, फटाका लावतो तो फुटत नाही. मग तो का फुटला नाही हे पहायला पुढे जाऊन लोक पाहतात आणि तेव्हाच स्फोट होतो आणि जखम होते. डोळा अतिशय नाजूक असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.