कोल्हापूर : औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्वातून दोन टोळ्यांमध्ये गोळीबाराचा थरार आदमापूरमधील एका हॉटेलमध्ये घडला. यात मांडीत गोळी लागून श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३२, रा. समता कॉलनी, पुलाची शिरोली) जखमी झाला. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत दोन्ही टोळ्यांतील १० संशयितांना ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे, दोन राऊंड, तलवार, कोयता जप्त केला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. शिरोलीमध्ये दोन दिवासांपूर्वी रोहित सातपुते टोळीने विनायक सुकुमार लाड-कोळी याच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी विनायकने दिलेल्या फिर्यादीवरून सातपुते टोळीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. लाड सध्या मुरगूडमध्ये राहतो. गुरुवारी झालेल्या भांडणानंतर तो आदमापूर येथे हॉटेलमध्ये राहण्यास गेला होता.
हॉटेलबाहेर थरार
लाडने फिर्याद दिल्याचा राग सातपुते टोळीला होता. विनायक त्याच्या मित्रांसोबत आदमापुरातील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती सातपुते टोळीला मिळाली. टोळीने शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हॉटेलमध्ये शिरून विनायक लाडवर गोळीबार केला, तर लाडच्या टोळीनेही प्रत्युत्तर देत गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात श्रीकांत मोहिते पायात गोळी लागून जखमी झाला.
पोलिसांची तारांबळ
विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी बंदोबस्त तैनात होता. पहाटेपासून पोलिस रस्त्यावर असतानाच आदमापुरात गोळीबाराचा प्रकार घडला. सुरुवातीला गोळीबार राजकीय कारणातून असल्याची अफवा पसरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. भुदरगड पोलिस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लाडला ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेल परिसरातून अनिकेत लाड, अनिकेत राऊत, आशिष वाडकर या लाडच्या साथीदारांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर...
गुरुवारी रात्री शिरोलीत दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी सातपुते टोळीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. दोन टोळ्यांमध्ये वारंवार भांडणाचे प्रकार सुरू असताना वेळीच पोलिसांनी संशयितांना अटक केली असती, तर गोळीबाराचा प्रकार घडला नसता, अशी चर्चा शिरोली परिसरात सुरू आहे.
सुपारी देऊन गोळीबार
स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्ववादातून विनायक लाड आणि पुलाची शिरोलीचा माजी सरपंच अविनाश कोळी यांच्यात वर्चस्ववाद सुरू आहे. काही वर्षांपूर्वी दोघे एकत्र होते. मात्र, आर्थिक कारणातून त्यांच्यात वितुष्ट आले. अविनाश कोळी व अभिजित कोळी या दोघांनी याच कारणातून विनायक लाड याला मारण्याची सुपारी श्रीकांत मोहिते याला दिली होती. यातून अभय ऊर्फ अभी एकनाथ काळोखे, वैभव साठे, ऋषिकेश भोरे, कार्तिक राजूरकर, जॉय भालेराव, अली बाचेखान तानेखान, रोहित सातपुते, अमोर कोळी, प्रसाद कांबळे, अनिकेत कांबळे (सर्व, रा. पुलाची शिरोली) यांनी हल्ला केल्याची फिर्याद अनिकेत लाड-कोळी याने भुदरगड पोलिस ठाण्यात दिल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.
परस्परविरोधी गुन्हा दाखल
गोळीबारात जखमी मोहितेने दिलेल्या फिर्यादीवरून विनायक कोळी, अनिकेत कोळी, आशिष वाडकर, नितिकेश राऊत (सर्व, रा. पुलाची शिरोली) यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक व अनिकेत कोळी या दोघांनी गोळीबार केल्याचे जखमी झालेल्याने सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुलाची शिरोलीत मोटारीच्या काचा फोडल्या
नागाव : स्क्रॅप व्यवसायातील वादातून पुलाची शिरोली येथील माजी उपसपंच अविनाश कोळी यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. यामध्ये दोन मोटारींचे मिळून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अविनाश कोळी यांच्या मोटार पार्किंगच्या ठिकाणी जाऊन विनायक लाड आणि त्याच्या समर्थकांनी मध्यरात्री बारा वाजता दंगा करून या काचा फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अविनाश कोळी याचा भाऊ अभिजित कोळी याने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विनायक सुकुमार लाड, अनिकेत सुकुमार लाड व अनिल माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.