Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकेका पत्रावर कोट्यवधींची कामे; बोलायची गरज काय? : आमदार गाडगीळ

एकेका पत्रावर कोट्यवधींची कामे; बोलायची गरज काय? : आमदार गाडगीळ
 

सांगली : विरोधक माझ्यावर मौनी आमदार अशी टीका करत आहेत. पण एकेका पत्रावर दहा-वीस कोटींची विकास कामे मंजूर झालेली आहेत. दहा वर्षात चार हजार कोटींचा निधी आणला. सरकार आपले असताना बोलायची गरज काय? मी आजपर्यंत कामातून उत्तर दिले आहे, यापुढेही कामच बोलेल, असे सडेतोड उत्तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले.

सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी झाला. श्री गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फुटला. श्री गणेश मंदिर, बालाजी मंदिर ते मारूती चौकापर्यंत प्रचार फेरी निघाली. सायंकाळी मारूती चौकात जाहीर सभा झाली. गाडगीळ म्हणाले, पहिल्या पाच वर्षातील विकास कामांमुळे 2019 च्या निवडणुकीसाठी संधी मिळाली. कामाच्या जोरावर दुसर्‍यांदा आमदार झालो. आताही कामाच्या जोरावर जनता मला तिसर्‍यांदा निवडून देईल. दहा वर्षात अनेक कामे केली. तरीही माझ्यावर मौनी आमदार अशी टीका विरोधक करत आहेत. सरकार आपले असताना तोंड उघडायला कशाला लागते? 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, गाडगीळ यांनी मतदारसंघात 4 हजार 80 कोटींचा निधी आणला. विधानसभा निवडणुकीत भाजपचाच प्रचंड विजय होणार आहे. विरोधकांना यापुढे 25 वर्षे घरात बसावे लागेल. सांगलीत विकास कोठे आहे, असे विरोधक म्हणत आहेत, ते डोळ्यावर पट्टी बांधून फिरत आहेत काय?

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, बँकेच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतला पैसा विरोधी नेते खात होते. आता महायुतीचे सरकार शासनाच्या तिजोरीचा पैसा जनतेसाठी देत आहे. महायुतीचे सरकार न आल्यास लाडकी बहीण, मोफत वीज, शेतकरी सन्मान यासह अनेक योजना बंद होतील. माजी आमदार दिनकर पाटील, जनसुराज्य शक्ती युवाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचेही भाषण झाले. मंजिरी गाडगीळ, महेंद्र चंडाळे, नीता केळकर, स्वाती शिंदे, दिलीप सूर्यवंशी, गीतांजली ढोपे-पाटील, विष्णू माने, जगन्नाथ ठोकळे, रोहित माळी यांची भाषणे झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आ. नितीन शिंदे, माजी महापौर गीता सुतार, विश्वजीत पाटील, अतुल माने, विलास शिंदे, सुनील भोसले, वैभव शिंदे, माधुरी वसगडेकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तावित प्रकाश ढंग यांनी केले. धीरज सूर्यवंशी यांनी आभार मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.