Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

`भविष्यात आमदारकी देण्याचा फॅक्स पाठवा तरच माघार`, उद्धवसेनेच्या बंडखोराची अजब अट

'भविष्यात आमदारकी देण्याचा फॅक्स पाठवा तरच माघार', उद्धवसेनेच्या बंडखोराची अजब अट
 
 
संभाजीनगरच्या (औरंगाबाद) मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी आधी माघार घेतली. हिंदू मतांचे विभाजन होऊन एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे तनवाणी यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या निर्णयाबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या सत्कारही केला. त्यानंतर शिवसेनेने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करत शहप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिली.

आता थोरात यांच्याविरोधात उपजिल्हाप्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक यांनी बंडखोरी केली आहे. भविष्यात आमदारकी देण्याचा फॅक्स पाठवा, मगच माघार घेतो, अशी मागणी ओक यांनी नेत्यांकडे केली. याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली.  आधी माघार, आता बंडखोरी झाल्याने जिल्ह्यात याची चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. चार) मध्य विधानसभा मतदारसंघातून भाकपचे ॲड. अभय टाकसाळ यांच्यासह 11 जणांनी माघार घेतली.

तर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बंडू ऊर्फ जयवंत ओक यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे आता 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून 35 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले होते. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची सोमवारची शेवटची तारीख होती. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण अर्ज कायम ठेवणार? कोणत्या पक्षात बंडखोरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दुपारी तीनपर्यंत एकूण अकरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

मध्य मतदारसंघात 24 उमेदवार असले तरी शिवसेना, एमआयएम व ठाकरे गटात खरी लढत पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, बंडखोरी केलेले बंडू ओक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांचे फोन आले होते. शिवसेना मात्र, भविष्यात आमदारकी देण्याचा फॅक्स पाठवा तरच माघार घेऊ, असे स्पष्ट केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अर्ज कायम ठेवल्याचे ओक यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. बाळासाहेब थोरात, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे सिद्दिकी नासेरोद्दिन तकीउद्दिन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुहास दाशरथे, बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक यांच्यासह विविध पक्षाचे असे एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.