Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेदाण्यावरील जीएसटीसह प्रश्न सोडवू :, डॉ.प्रमोद सावंत; अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी बैठक

बेदाण्यावरील जीएसटीसह प्रश्न सोडवू :, डॉ.प्रमोद सावंत; अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी बैठक
 

सांगली, दि.९: बेदाणा निर्यातीवरील जाचक जीएसटीसह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे दिली.
 
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ चार्टर्ड अकाउंटंट,कंपनी सेक्रेटरी आणि बँकांचे अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय जीएसटी कौन्सिलचे डॉ. सावंत सदस्य आहेत.

डॉ.सावंत म्हणाले, जीएसटी विषयक काही समस्या आज येथे मांडण्यात आल्या. त्या संदर्भात निवडणुकीनंतर मी निश्चितच श्रीमती सीतारामन यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करीन.कारण त्यांच्या पातळीवरच अनेक प्रश्न सुटणार आहेत. सहकारी पतसंस्था तसेच विकास सोसायटी यांच्यावरील जीएसटीच्या दंडाबाबतही  मी तो विषय वरिष्ठ पातळीवर  मांडीन.

ते म्हणाले, समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारत यासाठी सुधीरदादांना विजयी करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हळद बोर्डाची सांगली शाखा, तसेच विमानतळ आणि मोठा उद्योग येथे आणणे या केलेल्या घोषणा सांगलीच्या  विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हळद बोर्ड आणि विमानतळामुळे सांगलीतील हळद, बेदाणा, द्राक्षे, डाळिंबे आणि फळभाज्या यांची निर्यात शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. व्यापारही वाढणार आहे.
आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत आज येथे झालेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जीएसटी विषयक विविध प्रश्न येथे मांडण्यात आले.  डॉ. सावंत केंद्रीय जीएसटी समितीचे सदस्य असल्यामुळे च्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणे शक्य  होणार आहे.
 
पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची भाषणे झाली. स्वागत अक्षय जोशी यांनी केले. भालचंद्र कुलकर्णी (वांगीकर) यांनी जीएसटी विषयक मांडलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला. भाजप नेते गौतम पवार यांनी आभार मानले.
माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप नेत्या नीता केळकर ,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदि उपस्थित होते. चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्या संघटनांच्या वतीने मनीष अहुजा, कुशल खंडेलवाल, अमोल रुपनर यांनी डॉक्टर सावंत यांचे स्वागत केले.

फोटो
 
सांगली : चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि बँकातील अधिकारी यांच्या समवेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.