मुंबई शहरातील 'या' मतदार संघांत बॅलेटवर होणार मतदान
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघात अर्ज वैध ठरलेल्या ११६ उमेदवारांपैकी १२ जणांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरित एकूण १०५ उमेदवार निश्चित झाले आहेत. या मतदारसंघात १६ हून कमी उमेदवार उभे असल्याने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात एकाच बॅलेटवर (युनिट यंत्र) होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सोमवारी दिली.
मुंबई शहर जिल्ह्यात वडाळा, माहीम, मलबार हिल, मुंबादेवी आणि सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर दुसरीकडे धारावीतून तीन जणांनी, वरळीतून दोन, भायखळ्यातून पाच आणि कुलाब्यातून दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या सर्व मतदारसंघात आता एकूण १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सर्वाधिक उमेदवार हे सायन-कोळीवाडा मतदारसंघातून १५ जण मैदानात आहेत. त्या खालोखाल भायखळ्यात १४ आणि कुलाब्यात १३, तर धारावीतून १२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांत कमी सहा उमेदवार हे माहीम विधानसभा मतदारसंघात असून त्यानंतर शिवडी सात आणि वडाळ्यातून नऊ उमेदवार मैदानात असल्याने या सर्व विधानसभा मतदारसंघात युनिट यंत्रावर मतदान होणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.
२५ लाख ४३ हजार ६१० मतदार
मुंबई शहर जिल्ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ४३ हजार ६१० मतदार असून यासाठी एकूण दोन हजार ५३८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीची सर्व तयारी केली जात असल्याची माहिती यादव यांनी दिली. या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे दहा ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.