पुण्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. प्रचाराची सांगता होण्याच्या अवघ्या काही तासाआधी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एका माजी आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे माजी आमदार निवडणूक रिंगणात देखील आहेत. या प्रकरणी या माजी आमदारांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्याचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व विद्यमान उमेदवार शरद सोनवणे यांचा हा अश्लील व्हिडीओ असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनवणे यांचे अश्लील व चारित्र्यहनन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका स्थानिक व्यक्तीच्या इंस्टाग्राम पेज वरून हा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडिओ नारायणगाव व जुन्नर परिसरातल्या काही व्हाट्स अॅप ग्रुपवर देखील व्हायरल झाला आहे.
या घटनेची गंभीर दखल शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट मध्यरात्री आळेफाटा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत या प्रकरणी तक्रार दिली आहे. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल
शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेल्यावर त्यांनी याची दखल घेत सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस व्हिडिओ व्हायरल झालेल्या पेजची देखील तपासणी करत आहेत.
जुन्नर तालुक्यात चुरशीची लढत
जुन्नर तालुक्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल बेनके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर, भाजच्या बंडखोर उमेदवार आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, वंचित बहुजन आघाडीकडून देवराम लांडे निवडणुकीत उभे आहेत. या पाचही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यात आमदार शरद सोनवणे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.