हुपरी : सहलीसाठी राजस्थानमध्ये गेलेल्या येथील एकाच कुटुंबातील चौघे अपघातात जागीच ठार झाले. राजस्थानमधील पाली जिल्ह्यात शिवगंज
पाली राष्ट्रीय महामार्गावर बिरामी टोल नाक्याजवळ त्यांच्या मोटारीचा
अपघात झाला. आडव्या आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारीवरील
नियंत्रण सुटल्याने मोटार उलटली आणि रस्त्याकडेच्या झाडावर जोरात जाऊन
धडकली. अपघात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये येथील चांदी व्यावसायिक बाबूराव नारायण चव्हाण (वय ४९), त्यांची पत्नी सारिका (३८), मुलगी साक्षी (१९) व मुलगा संस्कार (१७, सर्व रा. संभाजी मानेनगर झोपडपट्टी, हुपरी) यांचा समावेश आहे. याबाबत येथे मिळालेली माहिती अशी : बाबूराव चव्हाण गेल्या तीस वर्षांपासून येथे राहायला आहेत. कपिलेश्वर (ता. राधानगरी) हे त्यांचे मूळ गाव. हुपरी तसेच तुरुंबे (ता. राधानगरी) येथे त्यांचा सोने-चांदी दागिन्यांचा व्यवसाय आहे.
दिवाळीनंतर त्यांनी राजस्थानमधील
प्रेक्षणीय तसेच धार्मिकस्थळी सहलीचा बेत आखला होता. त्यानुसार ते
कुटुंबासह मंगळवारी (ता. १२) सकाळी येथून रवाना झाले होते. सोबत त्यांनी
पट्टणकोडोलीमधील दोघा नातेवाइकांना घेतले होते. कोल्हापूरमधून ते रेल्वेने
राजस्थानला गेले. तेथून त्यांनी आपल्या व्यापारी मित्राची मोटार घेऊन सहल
सुरू ठेवली होती. ते सर्वजण गुरुवारी (ता. १४) सकाळी शिवगंज (सिरोही) मधून
जोधपूरला गेले. रात्री परतत असताना रस्त्यात आडवी गाय आली. तिला
चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव मोटार उलटून रस्त्याकडील झाडावर जाऊन
धडकली.
त्यात मागील सिटवर बसलेले चांदी व्यावसायिक बाबूराव यांच्यासह त्यांची पत्नी सारिका व मुलगी साक्षी, मुलगा संस्कार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती आज दुपारी येथे समजताच चव्हाण यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. ते पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले. अपघातात अख्या कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. येथील त्यांचे काही नातेवाईक घटनास्थळी राजस्थानला रवाना झाले आहेत. व्यवसायात बसविला जम बाबूराव चव्हाण साधे आणि सरळ मार्गी म्हणून परिचित होते. त्यांचे थोरले भाऊ दत्तात्रय तसेच मेहुणे अशोक ससे यांच्या मदतीने त्यांनी चांदी व्यवसायात जम बसविला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.