इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्तासाठी कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील अर्नाळी युनिटच्या एका होमगार्डला कामाच्या अतिरिक्त ताणामुळे हृदयविकार आणि अर्धांगवायूचा झटका आला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत या जवानाची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली.
गोपीकृष्ण (वय २८, रा. हरनाळी, पोस्ट बैरणकोप्पा, जि. शिमोगा), असे या गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी ते १८० जणांच्या तुकडीतून इस्लामपूर येथे आले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यातच हृदयविकाराचा सौम्य धक्का बसून पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला. पोलिस निरीक्षक संजय हारूगडे, हवालदार दीपक ठोंबरे यांनी तातडीने गोपीकृष्ण यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कोयना रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी रुग्णालयात येऊन निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या गोपीकृष्ण यांची रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली, तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबत चर्चा करून गोपीकृष्ण यांच्या उपचाराबाबत कोणतीही कसर ठेवू नका, उत्तमोत्तम दर्जाचे उपचार करा, अशा सूचना दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.