Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापरे. टॅटूची हौस भोवली, दोन मित्रांना एड्सची लागण ! मूतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका मित्राच्या रक्त चाचणीतून सत्य आले समोर

बापरे. टॅटूची हौस भोवली, दोन मित्रांना एड्सची लागण ! मूतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका मित्राच्या रक्त चाचणीतून सत्य आले समोर
 

आझमगड (उत्तर प्रदेश): सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आजकाल युवा वर्गात शरीरावर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. तरुण-तरुणी शरीरावर वेगवेगळे डिझाईन्स आणि आकाराचे टॅटू काढत असतात. फॅशन म्हणून काढले जाणारे हे टॅटू जीवघेण्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतील, असा कोणी विचारही करू शकणार नाही; पण उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

यात्रेमध्ये टॅटू काढून घेणाऱ्या दोन मित्रांना नंतर एड्स झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आझमगडमध्ये दोन मित्र जवळपास वर्षभरापूर्वी यात्रेमध्ये गेले होते. यात्रेत अनेक जण टॅटू काढून घेत असल्याचे पाहून त्यांच्याही मनात टॅटू गोंदवून घेण्याची इच्छा झाली. त्यानुसार, दोन्ही मित्रांनी आपल्या हातावर आवडीचे टॅटू काढून घेतले; पण हे टॅटू काढून घेणे दोन्ही मित्रांना नंतर चांगलेचं महागात पडले. मूतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी एक मित्र रुग्णालयात गेला असताना शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या रक्त तपासणीत त्याला एड्स झाल्याचे निदान झाले. ही माहिती समजल्यानंतर दुसऱ्या मित्राने देखील चाचणी केली. यात त्याला देखील एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना मोठा धक्का बसला.
डॉक्टरांच्या समुपदेशामधून समजले की, टॅटू काढलेल्या ठिकाणाहून दोघांना या आजाराची लागण झाली. सद्यस्थितीत दोन्ही युवक आझमगड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे यापूर्वीदेखील चालू वर्षातील एप्रिलमध्ये वाराणसी विभागात टॅटूच्या माध्यमातून अनेकांना एचआयव्हीचे संक्रमण झाल्याची बाब समोर आली होती.

टॅटू काढताना अशी घ्या काळजी
टॅटूची हौस पूर्ण करायची असल्यास सुरक्षाविषयक बाबींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. टॅटू काढणारा प्रत्येक वेळेस नवीन सुईचा वापर करतो की नाही, हे तपासले पाहिजे किवा सुईचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण केले जाते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, एकाच सुईद्वारे अनेक लोकांच्या शरीरावर टॅटू काढले जात असल्यास संक्रमक आजारांची लागण होण्याचा धोका वाढतो किंवा एड्सग्रस्त व्यक्तीसाठी वापरलेली सुई इतरांसाठी वापरल्यास त्यातूनही एचआयव्हीचे संक्रमण होऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.