सांगली ः सांगली विधानसभा मतदार संघात गेली पंधरा वर्षे काँग्रेसचा आमदार नाही. हे चित्र बदलायला काँग्रेसच्या विचाराचा प्रत्येक मतदार, कार्यकर्ता सज्ज असताना काही अनपेक्षित घडले आहे. मतदार सुज्ञ आहेत. जे घडतेय, ते का, कसे, कशासाठी, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी वसंतदादांच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय. मी सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
त्यांनी सायंकाळी कृष्णा नदीकाठावर वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी आली तेंव्हा काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला होता. त्यावेळी वसंतदादांच्या विचाराने वाढलेली काँग्रेस पुढे न्यायची, हाच निर्धार होता. चहूबाजूंनी संकट असताना, भाजपकडून सुडाचे राजकारण होत असताना त्याविरोधात उभे राहिलो. काँग्रेस विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढला. तो कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. दहा वर्षे काँग्रेससाठी सारे मिळून झटले. आज समज-गैरसमजातून जे काही घडले आहे, त्यावर नक्की फेरविचार होईल. काँग्रेस एकसंध राहील, असा मला अजूनही विश्वास आहे.
आमचे नेत डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची पूर्ण ताकद सोबतीला उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडातील सर्व घटकपक्ष सोबत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी मला साथ दिली आहे. मी दादांच्या समाधीवर मी शपथ घेऊन आलोय, जिंकल्यानंतर आधी दादांच्या समाधीवर डोके ठेवेन आणि मगच गुलाल उधळेन.’’
ते म्हणाले, ‘‘काँग्रेसमध्ये फूट पडली असे समजून भाजप खूष होत असेल तर त्यांनी स्वप्नातून बाहेर यावे. त्यांनी दहा वर्षे सांगली खड्ड्यात घातली. कार्पोरेट राजकारण केले. राज्यात सत्ता असताना त्यांना सांगलीत बदल घडवता आला नाही. तो घडवायचा असेल तर बदल घडला पाहिजे, याची जाणीव मतदारांना आहे. त्यांच्यासमोर आम्ही ताकदीने जाऊ.’’
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.