सांगली:- सांगलीमध्ये मागील विधानसभेच्या वेळी जयश्री मदन पाटील यांनी दाखवलेली प्रगल्भता यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी न दाखवल्यामुळेच यावेळी आम्हाला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. ही लढाई सत्तेसाठी नसून सत्यासाठी आहे, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले.
लोकसभेप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांची काँग्रेसने लादली आहे. गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी 2024 ला जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी हा शब्द फिरवला. आता विधानपरिषदेची भाषा त्यांच्याकडून येत आहे. पण आम्ही विधानपरिषद कधी मागितलीच नाही, असा खुलासा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर दहा वर्षात मीच काम केले असल्याचे पृथ्वीराज पाटील सांगतात. पण गेल्या 35 वर्षात दादा घराण्याने जनतेची कामे केली आहे. ती केवळ स्वार्थ किंवा उमेदवारीसाठी नाही, असा आरोप त्यांनी केला.
प्रतिक पाटील म्हणाले, मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांचा दावा योग्यच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका अशा अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घडवले आहेत. पक्षासाठी विधायक कामे केली आहेत. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. लोकसभेला देखील दादा घराण्याबाबतीत असेच घडले आणि विधानसभेलाही तेच घडले. त्यामुळे विधानसभेला जयश्री पाटील समाजासमोर अपक्ष म्हणून जात आहेत.
पण त्यांनी विधानपरिषदेची मागणी केली नव्हती. पृथ्वीराज पाटील हे चुकीचे बोलत आहेत. काँग्रेस नेते देखील खंत व्यक्त करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील व खा. विशाल पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या. बैठका घेतल्या. त्यामुळे कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. याचे भांडवल पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस नेत्यांकडे केले. त्यापेक्षा 2024 ला विधानसभेला जयश्री पाटील यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी का पाळला नाही?
महापूर व कोरोनामध्ये खा. विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याला उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. दादा घराणे कधी स्वार्थासाठी किंवा उमेदवारी मिळविण्यासाठी असली कामे सांगत नसल्याचा टोला प्रतिक पाटील यांनी लगाविला. काँग्रेसमध्ये मत विभागणी होणार नाही. भाजपमध्ये जोरदार मतविभागणी सुरू आहे. त्याचा फायदा जयश्री पाटील यांना होणार असल्याचे प्रतिक पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या काही नेत्यांकडून दिशाभूल...
मराठा समाजाचे काही पदाधिकारी कोणात्या तरी घरात बसून मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. समाजाने कोणत्याही एका व्यक्तिला पाठिंबा दिला नाही. समाज बांधवांमध्ये असे राजकारण होता कामा नये. समाजासाठी आजपर्यंत दादा घराण्याने खूप काही केले आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी थेट एक व्यासपीठ उभारावे. त्या व्यासपीठावर आ. सुधीर गाडगीळ, जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांना बोलावून समाजासाठी कोणी काय केले? याबाबत प्रश्न विचारावेत, असे आव्हान प्रतिक पाटील यांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.