Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी विनोद तावडेंनी वापरला 'हुकूमी एक्का'?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी विनोद तावडेंनी वापरला 'हुकूमी एक्का'?
 



महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाला आलेले महत्त्व ओळखून निवडणुकीच्या काळात सक्रिय झालेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आज अखेरची खेळी केली. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले विनोद तावडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी संघटनात्मक निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रीपदावरही चर्चा केली असून याकरीता अप्रत्यक्षपणे आपले नाव मुख्यमंत्रीपदासाठी दामटण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.

काल मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते, मावळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करून देताना भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना आपले पूर्ण समर्थन असेल अशी घोषणा केली होती. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित झाले. मात्र तरीही आज तावडे यांनी अमित शाह यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मराठाव्यतिरिक्त चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील आणि ते उमटू नयेत म्हणून काय करावे लागेल यादृष्टीने चर्चा केली आणि यानिमित्ताने त्यांनी आपला चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चालतो का याची चाचपणी करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाकरीता आपल्या नावाचाही विचार व्हावा असे सुचविल्याचे सूत्रांनी सांगितले.


तावडे यांच्या या बैठकीचे वृत्त पसरताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज पुन्हा सरसावले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ओबीसी तसेच मराठेतर समाजाचे हित जपण्यासाठी फडणवीस यांनीच प्रयत्न केल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळेच काही जण फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. याआधीही भुजबळ यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट केले होते. मतमोजणी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाला आमचा पाठिंबाच राहील असे जाहीर करून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा दावा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.
महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर झालेल्या प्रचारात अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. असे असतानाही मनोज जरांगे यांनी निर्माण केलेले वातावरण पाहता विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. विविध माध्यमांना मुलाखती देत त्यांनी महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री होतील का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्याच्या नावाची चर्चा असते तो मुख्यमंत्री बनत नाही असे सांगत त्यांनी यासाठी मध्य प्रदेश तसेच राजस्थानचा दाखला दिला होता. त्यापाठोपाठ तावडे यांनी राहुल गांधी यांच्या अदानी विरोधातील प्रचाराला एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते. 
 
हे सर्व करताना विनोद तावडे यांची देहबोली असेच सांगत होती की ते महाराष्ट्राचे पुढचे संभाव्य मुख्यमंत्री असतील. मात्र यानंतर वसई परिसरात एका हॉटेलमध्ये पैसे वाटण्याच्या एका प्रकरणात विनोद तावडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला. या कथित प्रकरणात हितेंद्र ठाकूर तसेच क्षितिज ठाकूर या दोन आमदारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी तावडे यांना जवळजवळ तीन तास एका हॉटेलच्या खोलीत रोखून धरले होते. त्यावेळी हॉटेलमधून ९ लाखांची रोकड जप्त तकरण्यात आली होती. या प्रकरणात निर्माण झालेली तावडे यांची स्थिती एका व्हिडिओद्वारे सर्वत्र पसरवली गेली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तावडे यांनी हे आपल्याविरोधात केलेले कारस्थान होते, असा दावा केला. 
'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी..' अशा थाटात तावडेंनी काँग्रेसच्या नेत्यांना अब्रूनुकसानीच्या दाव्याचा नोटीसा पाठवल्या. तावडेना रोखणारे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते. परंतु आपली बदनामी केली अशा नोटिसा काँग्रेस नेत्यांना धाडल्या गेल्या. या प्रकरणानंतर काहीसे बॅकफूटवर आलेले तावडे आज पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी या विषयावर थेट अमित शाहंशी चर्चा केली. या चर्चेचे फलित काय निघते हे आज रात्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.