अपंग व्यक्तींच्या आनंदी नातेसंबंधांची उदाहरणं समोर येणं खूप महत्त्वाचं आहे, असं होली ग्रेडरने सांगितलं.
होली अवघ्या 16 वर्षांची होती जेव्हा तिला एका व्यक्तीने विचारलं की, 'तुला अपंग असल्यामुळे लैंगिक संबंध ठेवता येतात का?'
गेल्या अनेक वर्षांपासून इतरही बरेच प्रश्न तिला विचारले गेले आहेत. या प्रश्नांमध्ये 'ती योग्य प्रकारे लैंगिक संबंध ठेऊ शकते का?' किंवा 'लैंगिक संबंध ठेवताना व्हीलचेअरवर बसणे आवश्यक आहे का?' अशाही काही प्रश्नांचा समावेश आहे.
"लोकांना वाटतं की, ते लैंगिक संबंधांची ऑफर देऊन उपकार करत आहेत किंवा अपंग व्यक्तीसाठी त्याग वगैरे करत आहेत. मात्र, आता मी अशा प्रश्नांवर आश्चर्यचकित होत नाही किंवा नाराजही होत नाही," असं होली सांगते. होली आता 26 वर्षांची आहे. तिला क्रोनिक पेन आणि हायपरमोबिलिटी सिंड्रोम आहे. ती अशा अपंग महिलांपैकी एक आहे ज्यांनी नातेसंबंधांवर बोलताना नकारात्मक साचेबद्ध विचारांना आव्हान दिले.
अपंग व्यक्तींच्या आनंदी नातेसंबंधांची उदाहरणं समोर येणं खूप महत्त्वाचं आहे, असं होली ग्रेडर म्हणते. होलीने किशोरवयात असताना तिचा सध्याचा जोडीदार (नवरा) जेम्सला डेट करायला सुरुवात केली होती. 9 वर्षे नात्यात राहिल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी लग्न केलं आहे.
जोडीदाराकडून तिला नेहमीच पाठिंबा मिळतो. मात्र, इतरांकडून पूर्वग्रहदुषित अनुभव येतात, असं ती सांगते. "अनेकदा माध्यमांमध्ये अपंग लोकांचं जीवन दयनीय असल्याचं आणि आम्ही फक्त दुःखद जीवन जगतो असं दाखवण्यात आलेलं असतं," असंही ती नमूद करते. जेम्ससोबतच्या नात्यावर बोलताना होली म्हणाली की, "आम्ही सुरुवातीला एकत्र आलो तेव्हा मला लोकांनी सांगितलं होतं की, तुझी तब्येत बिघडली, तर तो तुला सोडून जाईल."
"एक ओझं असल्याची भावना"
लोकांच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या विचारांवर बोलताना होली म्हणाली, "शाळेत माझ्याबद्दल लोकांची काही गृहितकं होती. काही लोकांनी त्याबद्दल मला थेटही विचारलं होतं." "अपंग व्यक्ती लैंगिक संबंध ठेऊ शकते का, हा पहिला प्रश्न नेहमीच विचारला जातो," असं होलीने सांगितलं.
ती म्हणाली "शाळेत तिच्या वर्गातील मुले वैयक्तिक आणि अनाहूत प्रश्न विचारायचे."
"तुला केवळ व्हीलचेअरवरच लैंगिक संबंध ठेवता येतात का? लैंगिक संबंध ठेवताना तुझे सांधे दुखतील का?" असे प्रश्न विचारले गेल्याचं तिने सांगितलं. लोक लैंगिक संबंधांबाबत तिला सोशल प्लॅटफॉर्म्सवरही मेसेज करतात आणि तिनं स्वतःला नशिबवान समजायला हवं अशा अविर्भावात 'ऑफर'ही देतात.माध्यमांमध्ये अपंगांचं अधिक चांगलं प्रतिनिधित्व दिसायला हवं, असं सांगताना होलीने 'सेक्स एज्युकेशन' या वेब सीरिजमधील आयझॅक गुडविन या व्यक्तिरेखेचा दाखला दिला. तसेच तिला अलीकडे तेवढं एकच उदाहरण दिसल्याचंही तिनं म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.