सांगोल्याचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.
"सन १९९० मध्ये राजकीय जीवनास सुरुवात झाली. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सात निवडणुका पार पाडल्या. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभा राहण्यास कोणी तयार नव्हते. आज मात्र तालुक्यात विधानसभा निवडणूक लढवायला चढाओढ लागली आहे. यापूर्वी तुम्ही, विधानसभा निवडणूक लढला असता तर मी तुमचा प्रचार केला असता. आता माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा," असं पाटील यांनी म्हटलं आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिंदेसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बलवडी येथे श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, "माझा संसार पणाला लावला; पण तालुक्यातील माझ्या जनतेचा संसार फुलवला. विरोधक म्हणतात मोठा बंगला बांधला; पण त्यांचे किती बंगले आहेत हे मोजायलाही घावत नाहीत. तसेच विकास कागदावरच आहे असे म्हणतात. मी तयार केलेली विकासकामाची पुस्तिका पाहून चौकशी करावी, मग बोलावे. त्यांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाही याची खात्री आहे. विरोधक फक्त टीका करण्याचे काम करतात."
दरम्यान, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, साहेबराव शिंदे, ज्येष्ठ नेते विजय शिंदे, अॅड. विक्रमसिंह पाटील, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, महादेव शिंदे, होलार समाज संघटनेचे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष दीपक ऐवळे, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, भाजपचे नेते श्रीकांत देशमुख, अजिंक्य शिंदे आदींची भाषणे झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.