मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपबरोबर हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती; मात्र हे सरकार अल्पावधीत कोसळले.
शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच तो शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. आज त्यांनी पहाटेच्या शपथविधीची बैठक गौतम अडानी यांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत झाली होती, असा आणखी एक गौप्यस्फोट केला.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीसाठी मोठ्या उद्योगपतीच्या घरात ही चर्चा झाली होती, असे अजितदादा म्हणाले होते. हा मोठा उद्योगपती कोण, याबाबत त्यांनी आज माहिती देताना अदानी यांचे नाव घेतले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वादळ निर्माण झाले. यामुळे या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अन् अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय खेळीमुळे संपूर्ण राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती; परंतु शरद पवार यांनी या युतीला पाठिंबा न दिल्याने अवघ्या ८० तासांत हे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपची साथ का दिली? त्यांना शरद पवार यांचा पाठिंबा होता का? असे प्रश्न आजही राजकीय वर्तुळात उपस्थित केले जातात.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या राजकीय समीकरणासाठी शरद पवार यांचा पाठिंबा होता. याबाबत एका मोठ्या उद्योपगतीच्या घरी चर्चाही झाली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, "आमचे वरिष्ठ नेते जसे सांगतात तसे आम्ही करतो. २०१९ च्या घटनेला आता ५ वर्षे झाली. सर्वांना माहित आहे कुठे मीटिंग झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरात मीटिंग झाली. पण आता जे झाले ते झाले.'' दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी पाच बैठका झाल्याचे सांगितले जाते. या बैठकांबाबत ते म्हणाले, "हो. पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, मी, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरले होते; परंतु त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केले आहे."राष्ट्रवादी आणि भाजपची युती होत असताना शरद पवार यांनी नकार का दिला? त्यांनी या युतीला पाठिंबा का दिला नाही? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "शरद पवारांच्या मनात काय आहे, हे जगात कोणलाच ओळखता येणार नाही. कोणालाच नाही. मलाही नाही. माझी काकीही सांगू शकणार नाही." दरम्यान, या प्रकरणावर गौतम अदाणी यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. अजित पवार यांनी मुलाखतीत पाच वर्षांपूर्वीचा उल्लेख केला; मात्र अदाणी २०१७ च्या बैठकीत हजर होते, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.