महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. सांगलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात सांगली जिल्हा सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे.
जयश्रीताईंची समजूत काढण्याची जबाबदारी माजी मंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या खांद्यावर सोपवली आहे. मात्र, जयश्री पाटील या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने फोन करूनही त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत, त्यामुळे सांगलीत लोकसभेची पुनरावृती होण्याची शक्यता अधिक आहे.
काँग्रेसकडून जयश्री मदन पाटील या इच्छूक होत्या. मात्र, काँग्रेसकडून सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनाच पुन्हा उमेदवार देण्यात आली आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांनी सांगलीतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (ता. ०४ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे, त्यामुळे काँग्रेसकडून जयश्री पाटील यांनी माघार घ्यावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवली जात आहेत. खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यावर जयश्री पाटील यांची समजूत काढण्याची जबाबदारी काँग्रेसने सोपवली आहे.
काँग्रेस नेत्यांच्या आदेशानुसार कदम आणि खासदार पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्यासोबत चर्चाही केली आहे. मात्र, निवडणूक लढविण्यावर त्या ठाम आहेत. सांगली शहरात मदन पाटील गटाचे मोठे नेटवर्क आहे. सांगली शहरातील नगरसेवक एक मोठा गट आजही मदन पाटील गट म्हणून ओळखला जातो. तो गट कायम राहावा, यासाठी जयश्री पाटील यांना निवडणूक लढविणे क्रमप्राप्त आहे. त्यातूनच आपला गट शाबूत ठेवण्यासाठी जयश्री पाटील ह्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता कमीच वाटते आहे.
जयश्री पाटील यांनी सांगली मतदारसंघातून माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्या मनधरणीलाही जयश्री पाटील बधल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची खरी कसोटी लागणार आहे.सांगली मतदारसंघातून 'सांगली पॅटर्न'ची पुन्हा यशस्वी होणार की दोन काँग्रेस नेत्यांच्या भांडणात भाजपचे सुधीर गाडगीळ पुन्हा निवडून येणार, हा खरा प्रश्न आहे. गाडगीळ पुन्हा निवडून आले तर सांगली पॅटर्न काँग्रेसवर उलटला असे म्हणावे लागेल. आता काँग्रेस जयश्रीताईंची बंडखोरी कशी पद्धतीने थोपवते हे पाहावे लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.