मिरजेत सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा जप्त, दोघांना अटक १२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली: मिरजेतील जुगाई कॅलनी येथे केलेला सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
आशरफ बाबू सय्यद (वय ३०, रा. वखारभाग, मिरज), मोईन मुबारक निपाणीकर (वय ३४, रा. अमननगर, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांसह मुबारक सलीम मुजावर याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू याचा साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे विशेष पथक तयार केले होते.
पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना आशरफ सय्यद याने जुगाई कॅलनी येथे सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे सुगंधी तंबाखूचा साठा सापडला. त्यावेळी तेथे असणाऱ्या सय्यद आणि निपाणीकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर यामध्ये मुबारक मुजावर याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. दोघांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देऊन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.