Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खानापूरमध्ये दोन माजी आमदारपुत्रांमधील लढत चुरशीची

खानापूरमध्ये दोन माजी आमदारपुत्रांमधील लढत चुरशीची
 

सांगली : खानापूर मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत दोन माजी आमदारपुत्रांचा एका माजी आमदारांशी सामना अंतिम टप्प्यात रंगतदार बनला आहे. जिल्ह्यातील एकमेव जागा लढवत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही जागा प्रतिष्ठेची असून स्व. अनिल बाबर यांच्या पश्‍चात होत असलेल्या या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणूकपूर्व राजकीय गणिते बदलली आहेत. आटपाडीच्या देशमुख वाड्यासाठी आटपाडी तालुक्याने स्वाभिमानाचा विषय बनवला असल्याने विट्याच्या पाटील गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि सहानभुतीच्या लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्या बाबर गटालाही जमिनीवर आणले आहे.

 

खानापूर, आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावे अशा या तीन तालुक्यांत विभागलेल्या मतदारसंघावर गेल्या दोन निवडणुकीत स्व. बाबर यांनी वर्चस्व राखले आहे. आ. बाबर यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर नेतृत्वाची पोकळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी भरून काढण्याचा विडा उचलला आहे. टेंभू सिंचन योजनेचे पाणी हा गेल्या तीन दशकातील ज्वलंत प्रश्‍न होता. यावेळी विस्तारीत योजनेला मिळालेल्या मंजुरीचे श्रेय कोणाचे यावरून संघर्ष सुरू आहे. आटपाडीचे देशमुख यांनी १९९५ च्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून येत या भागासाठी स्व. आमदार संपतराव देशमुख यांच्या पाठिंब्याने सिंचन योजनेचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. मात्र यानंतर बाबर यांनी या योजनेचा पाठपुरावा कायम ठेवत या योजनेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचेही कमी अधिक प्रमाणात योगदान आहे. दुसर्‍या बाजूला पाणी संघर्ष समितीचा रेटाही कारणीभूत ठरला असेच म्हणावे लागेल.आता शिवारात पाणी खेळू लागल्यानंतर आणि वंचित गावांना पाणी मिळण्याची आशा निर्माण झाल्यानंतर श्रेयवाद उफाळून आला आहे. 

या मतदारसंघामध्ये गेल्या तीन निवडणुका बाबर विरुद्ध पाटील अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच झाल्या आहेत. यामुळे यावेळीही अशीच लढत होईल अशी अपेक्षा असताना अखेरच्या टप्प्यात आटपाडीच्या देशमुखांनी रणमैदानात उतरण्याचे जाहीर केले. उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. या पक्षाची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय अंदाज धुळीस मिळवले. 

दुसर्‍या बाजूला उमेदवारीच्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्षपद सोडून वैभव पाटील यांनी तुतारी वाजवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारी घेतली. उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची त्यांची तयारी होती. प्रसंगी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारीही त्यांनी केली होती. यासाठी आटपाडीत मित्रही शोधले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात देशमुखांची उमेदवारी समोर आल्याने त्यांनाही स्वबळाचा अंदाज नव्याने घ्यावा लागत आहे. तासगाव तालुक्यात संजयकाका पाटील यांची ताकद सोबतीला मिळण्याची आशा असली तरी तेथेही आबा गटाकडून बाबरांना मदत होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद पडलेल्या माणगंगा कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे सांगितल्याने पाटील गटाची कोंडी झाली. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आमदार पाटील यांना दुसर्‍यांदा सभा घेऊन खुलासा करावा लागला. देशमुख गटाला परत फिरा म्हणून आर्जवे करावी लागली. यामुळे देशमुख गटातील धाकटी पाती म्हणून ओळख असलेल्या अमरसिंह देशमुखांनी आता ताकद दाखविण्याचा चंग बांधला आहे. देशमुखांचा खानापूर तालुक्यातील बाबर व पाटील गटावर नाराज असलेल्या मतावंर डोळा आहे, तर बाबरांचे स्वत:चा गट शाबूत ठेवत आटपाडीतून जास्तीत जास्त मतदान आपणास कसे होईल याकडे लक्ष आहे. पाटील गटाचे विटा शहरात वर्चस्व असले तरी त्यांनाही आटपाडीमध्ये नवे मित्र शोधावे लागत आहेत. या साठमारीत कोण कुणाच्या ताटातील आणि किती पळवते यावर निकालाचा कल ठरणार आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.