मी चोरी करण्यासाठीच थोडीच आलीये... गाडी अडवल्यावर प्रतिभा काकी पवार भडकल्या, बारामतीत नेमकं काय घडलं?
बारामती : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची गाडी बारामती टेक्सटाईल पार्कच्याबाहेर अडविण्यात आली. आमची गाडी दिसताच सुरक्षारक्षकाने पार्कचे गेट बंद केले. आम्ही विचारपूस केली असता, आतमधून फोन आल्याने गेट बंद केले, असे सुरक्षारक्षकाने सांगितले, असे प्रतिभा पवार म्हणाल्या. यावेळी प्रतिभाकाकी पवार संतापलेल्या दिसून आल्या. आम्ही चोरी करण्यासाठी थोडीच आलोय. आम्ही तर शॉपिंग करण्यासाठी आलोय. आम्हाला का अडवले? असे सुरक्षारक्षकाला प्रतिभा पवार यांनी विचारले. विशेष म्हणजे बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जेमतेम काही तास राहिलेले आहेत. प्रचारातून उसंत घेऊन प्रतिभा पवार त्यांची नात रेवती सुळेंबरोबर खरेदी करण्यासाठी बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये गेलेल्या होत्या. परंतु पार्कमध्ये जायच्या आधीच त्यांची गाडी अडविण्यात आल्याचा आरोप होत आहे.बारामतीच्या टेक्सटाईल पार्कच्या बाहेर नेमकं काय घडलं?
बारामती प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आला. शरद पवार यांची सांगता सभा सोमवारी दुपारी होणार आहे. तत्पूर्वी त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे या खरेदीसाठी बारामतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांची गाडी दिसताच सुरक्षारक्षकाने गेट बंद करून घेतल्याचा आरोप होत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओत स्वत: प्रतिभा पवार या सुरक्षारक्षकासोबत संवाद साधताना दिसून येत आहेत. तुम्हाला गेट बंद करण्यास कुणी सांगितले? असे प्रतिभाकाकींनी विचारल्यावर कंपनीचे सीईओ वाघ यांचा आम्हाला फोन आला होता, असे सुरक्षारक्षकाने सांगितले. आधी तर गेट सुरू होते, मग आमची गाडी दिसल्याबरोबर गेट का बंद केले? असेही प्रतिभाकाकींनी विचारले. त्यावर मी तर केवळ सुरक्षारक्षक आहे, मला आतून फोन आल्याने मी गेट बंद केले, असे त्याने सांगितले.
त्यावर प्रतिभाकाकी भडकलेल्या दिसून आल्या. आतमध्ये खरेदी विक्री सुरू आहे मग आम्हाला आतमध्ये जाऊ देण्यास काय अडचण आहे, आम्ही चोरी करण्यास थोडीच आलोय.. आम्ही तर खरेदी करण्यासाठी आलो आहे. आम्हाला बॅग खरेदी करायची आहे, असे म्हणत त्यांनी सुरक्षारक्षकाला विनंती केली. मात्र आतमधून फोन आल्याने मी काहीही करू शकत नाही, असे सुरक्षारक्षकाने सांगितल्याने शेवटी प्रतिभा पवार या कारमध्ये जाऊन बसल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.