कणकवली/नांदगाव ः महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय 55, मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा.भांडूप) यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आला.
विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. त्यांच्या घरी रात्री सोबत जेवण करून झोपण्यासाठी आलेला त्यांचा नातलग सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (24, कोळोशी-वरचीवाडी) यानेच या घटनेची माहिती आपल्या वडिलांसह 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना दिली.
सुरूवातीला तो विसंगत माहिती देत होता. मात्र त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान त्याने विनोद आचरेकर यांचा खून डोक्यात कुदळ मारून आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. खूनाचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही.खुनाची घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वा. च्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास संशयितानेच दिलेल्या माहितीमुळे हि घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कोळोशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विनोद आचरेकर हे दोन दिवसापुर्वीच घर व परिसराची साफसफाई करण्यासाठी गावी आले होते.ते मुंबई येथे सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत होते. गेल्या महिन्यात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे सर्व कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी संशयित सिध्दीविनायक पेडणेकर याने विनोद यांचा खून झाला असल्याची माहिती वडील संजय पेडणेकर यांच्यासह 100 नंबरवर कॉल करून पोलिस नियंत्रण कक्षास दिली तसेच 108 रुग्णवाहिकेसही दूरध्वनीव्दारे संपर्क साधून दिली. पोलिसांनी घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिसपाटील संजय गोरूले यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कणकवली व देवगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्क वितर्क
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता विनोद आचरेकर यांचा मृतदेह पूर्णपणे नग्नावस्थेत आढळून आला. तर डोक्याच्या मागच्या बाजूला जबर जखम झाल्याने मोठा रक्तस्त्राव घटनास्थळी झालेला होता. यावेळी लगतच आढळलेली कुदळ डोक्यात मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच घरातील डायनिंग टेबलवर दोन रिकामी काचेची ग्लास, एक दारुची बाटली, जेवणाची ताटे, पिशवी, रक्ताने माखलेली बेडशीट आढळून आली.
कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, स्थनिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे, अनिल हाडळ, हेमंत खोपडे, देवगड पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहा. पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, पोलिसपाटील संजय गोरूले, सरपंच गुरू आचरेकर, ग्रामसेवक मंगेश राणे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
संशयित अन् खून झालेले विनोद आचरेकर नातलग
खून झालेले निवृत्त सहायक पोलिस निरिक्षक विनोद आचरेकर हे संशयिताच्या वडीलांचे आतेभाऊ लागतात. विनोद आचरेकर यांचे कोळोशी गावात मूळ घर आहे. मात्र त्यांनी देवगड-निपाणी राज्यमार्गालगत दुसरे घर बांधले होते. ते मुंबईहून आले की तेथेच राहत, त्यांच्या घराची चावी संशयित सिद्धीविनायक पेडणेकर यांच्या घरी असायची. सध्या ते घर व परिसराच्या साफसफाईसाठी आले होते. त्यांना जेवणाचा डबा पेडणेकर यांच्या घरातून दिला जात होता.बुधवारी रात्री विनोद आचरेकर यांच्यासाठी जेवणाचा डबा घेवून संशयित सिद्धीविनायक गेला होता. त्याचे वडील त्याला मोटरसायकलने आचरेकर यांच्या घरी सोडून आले. ते मुंबईहून आल्यानंतर गेले दोन दिवस संशयित त्यांच्याच घरी रात्री झोपायला असे. गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास संशयिताचे वडील संजय पेडणेकर यांना संशयित सिद्धीविनायकचा फोन आला आणि त्याने काका विनोद आचरेकर यांचा खुन झाल्याचे सांगितले. हि घटना ऐकू न ते हादरून गेले. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यानच्या काळात संशयिताने दिलेल्या माहितीनुसार पोलिस पाटील संजय गोरुले व काही वेळाने पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
पोलिस पाटील श्री. गोरुले यांनी खुनाची घटना खरी असल्याचे सांगितल्यानंतर कणकवलीचे डिवायएसपी घनश्याम आढाव, कणकवलीचे प्रभारी पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार किरण मेथे, राजकुमार आघाव व एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहोचून बारकाईने पाहणी केली. फॉरेन्सिक टिमलाही पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञ, श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पथकाने तपासणी करत घटना घडलेले घर सील केले. तसेच संशयित सिध्दीविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी कणकवली येथे नेले. संशयित हा मयत श्री. आचरेकर यांच्या मामेभावांचा मुलगा आहे. घटनास्थळावरील तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. विनोद आचरेकर यांच्या खुनाची बातमी समजताच कोळोशी परिसर हादरुन गेला. विनोद आचरेकर यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
कोळोशी येथील या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. तसेच तपासाबाबत आवश्यक सुचना दिल्या. सुरुवातीला संशयित सिद्धीविनायक पेडणेकर हा पोलिसांना विसंगत माहिती देत होता मात्र नंतर त्याने सखोल चौकशीत विनोद आचरेकर यांचा खुन कुदळ डोक्यात मारून आपणच केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सिद्धीविनायक पेडणेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.दिवसभरात पोलिसांनी सखोल तपास केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या खुनाचे निश्चित कारण स्पष्ट झाले नव्हते. खुन झालेला मृतदेह नग्नावस्थेत आढळणे आणि संशयिताची एकूणच पार्श्वभूमी पाहता अनेक तर्कवितर्कही व्यक्त होत आहेत. घरात सर्वत्र रक्ताचे डाग आढळून आले होते. विनोद आचरेकर यांच्या मागील बाजूस कुदळाचा वर्मी घाव लागल्याने हा खुन झाला. मात्र तो नेमका कशासाठी झाला याचे गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास डिवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.
सिद्धिविनायक नेहमीच पोलिसांना कॉल करायचा
संशयित सिद्धिविनायक हा नेहमीच पोलिसांना कॉल करुन आपण हरवल्याचे सांगत असायचा. तसेच त्याला शोधण्यासाठी पोलिस भर रानावनात त्याचा शोध घ्यायचे. मात्र नंतर तो आपणच कॉल केला असल्याचे सांगायचा. यामुळे पोलिसांची अनेकवेळा त्याने तारांबळ उडवली होती अशी माहिती खुद्द पोलिसांकडून मिळाली. यामुळे आजचा कॉल तसाच होता की काय? असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र यावेळची माहिती खरी निघाली. खूनाच्या या घटनेने कोळोशी परिसर हादरुन गेला आहे.
मृतदेहाच्या अंगावर संशयित पडून...
पोलिसपाटील संजय गोरूले यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता, घरात सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता; तर जिथे मृतदेह पडला होता, तिथे संशयित सिद्धिविनायक हा मयत विनोद आचरेकर यांच्या मृतदेहावर पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोरूलेही आचंबित झाले. पोलिसांना ही घटना त्यांनी सांगताच पोलिसही चक्रावले. या कृतीमागे संशयिताचा नेमका हेतू काय असू शकतो? हे न सुटणारे कोडे, चर्चांना उधाण आणणारे ठरले.
संशयित सिद्धिविनायक पेडणेकरला स्त्री भूमिका करण्याची हौस
संशयित सिद्धिविनायक पेडणेकर याला नाटकात किंवा तमाशात स्त्री भूमिका करण्याची हौस आहे. त्याने त्यासाठी आपले लांब केसही वाढवले आहेत. मुलींचा पोशाख करून त्याने तसे फोटो काढले आहेत. तो रीलही बनवत असे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमाही केला आहे. त्याला कुठे ऑर्डर मिळाली तर तो जेवण बनवत असे. मात्र, तो विक्षिप्त वागत असल्याने वडिलांनी त्याची मानोसपचार तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली होती. मात्र, तो मनोरुग्ण नसून चांगला असल्याचा रिपोर्ट आल्याचे चौकशीत स्पष्ट झालेे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.