ज्यात पूजा नाईक प्रकरण गाजत असतानाच आता डिचोलीतील अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणाऱ्या प्रिया यादवला अटक करण्यात आली आहे. प्रियाला कोल्हापूरातील फुलेवाडी येथून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस
प्रियाच्या शोधात होते. प्रियाकडून यावेळी 116 ग्रॅम सोन्यासह 4 वाहने जप्त
करण्यात आली. सोन्याची किमत सध्याच्या बाजार भावानुसार 9 लाख रुपये आहे.
कोटींची फसवणूक
तपासादरम्यान समोर आले की, रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रियाने तब्बल 1 कोटींचा गंडा घातला. तपासात असेही समोर आले आहे की, प्रियाचे कोणतेही वैयक्तिक बँक अकाऊंट नाही किंवा तिच्या नावावर कोणतेही वैयक्तिक वाहन नोंदणीकृत नाही.
महाराष्ट्रातून अटक!
डिचोली पोलिस ठाण्यात प्रियाविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. डिचोली पोलिसांची टीम प्रियाच्या शोधात महाराष्ट्रात पोहोचली. कोल्हापूरातील फुलेवाडी येथून प्रियाला अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई डिचोलीचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली आणि उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय दिनेश गाडेकर, पीएसआय विकेश हडफडकर, पीसी विशाल परब, एलपीसी स्मिता पोपकर यांच्या पोलीस पथकाने पार पाडली.
प्रिया यादव होती फरार
रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरून संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह 20 हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ती लहान मुलीसमवेत डिचोलीत एका फ्लॅटमध्ये राहात होती. दोन महिन्यांहून अधिक काळ प्रिया फरार होती. अखेर डिचोली पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.
'मास्टरमाईंड' पोलिसाचे निलंबन
प्रियाने काहीजणांकडून आपल्यासह मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे उकळल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या कामात प्रियाला मदत केल्याच्या आरोपावरुन तसेच 'मास्टरमाईंड'असल्याच्या संशयावरुन रोहन वेंझी या पोलिसाला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.