मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. आता, रश्मी शुक्ला यांच्या जागी राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे.
राज्यातील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. सध्या तूर्तास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना आदेश दिल्यानंतर त्यांचा पदभार राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवला जाईल. मुख्य सचिवांना उद्या दुपारपर्यंत आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला
यांचा मूळ कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर राज्य सरकारने दोन वर्ष मुदतवाढ
दिली. त्यावेळी देखील सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
या 3 आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत...
राज्यात सध्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे आघाडीवर आहे. या तीनजणांपैकी एकजण नवीन पोलीस अधिकारी होणार आहे. यामध्ये रितेश कुमार यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
शुक्लांच्या नियुक्तीवरुन विरोधक आक्रमक...
रश्मी शुक्ला यांच्यावरून राज्यातलं वातावरण तापलं होतं. काँग्रेसनंतर शिवसेना ठाकरे गटानेही निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून त्यांना हटवण्याची मागणी केली होती. रश्मी शुक्ला यांच्या निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने त्यांना महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी निवडणूक आयोगाला केली होती. भाजपच्या आदेशावरून सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.