कोल्हापूर : निवडणूक तपासणी पथकातील अधिकारी असल्याचा बहाणा करून पुणे-बंगळूर महामार्गावर तावडे हॉटेलजवळील भर चौकात व्यावसायिक सुभाष हारणे (रा. बागल चौक, कोल्हापूर) यांना कारवाईची भीती घालून त्यांच्याकडील 25 लाख रुपयांची रोकड लुटून पसार झालेल्या सराईत टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने शनिवारी बेड्या ठोकल्या. संशयिताकडून 25 लाखांची रोकड, दोन आलिशान मोटारी असा 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून म्होरक्यासह दोघेजण अद्याप फरारी असल्याचे सांगण्यात आले.
संजय ऊर्फ माया महावीर किरंगे (42, रा. सुदर्शन कॉलनी, विक्रमनगर), अभिषेक शशिकांत लगारे (24, मणेर मळा, उचगाव, ता. करवीर), विजय तुकाराम खांडेकर (28, उचगाव, करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. म्होरक्या स्वप्नील तानाजी जाधव ऊर्फ लाल्या (रा. पाचगाव, ता. करवीर) व हर्षद खरात (सध्या राजारामपुरी, मूळ गाव उचगाव, करवीर) हे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके गोवा, बेळगाव, पुण्यासह सोलापूर जिल्ह्याकडे रवाना झाली आहेत.टोळीतील पाचही संशयितांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. संजय ऊर्फ माया किरंगे व स्वप्नील जाधव ऊर्फ लाल्या हे वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आहेत. तर उर्वरित तिघांवर गर्दी, मारामारीसह अन्य गंभीर गुन्ह्याचे रेकॉर्ड असल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
लुटमारीचा ठरला पाचगावला प्लॅन
टोळीतील पाचजणांशिवाय आणखी काही संशयितांचा लुटमारीच्या गुन्ह्यात सहभाग असावा, असा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वप्नील जाधव जेरबंद झाल्यानंतर टोळीच्या आणखी कारनाम्यांचा पर्दाफाश होईल, असेही त्यांनी सांगितले. बागल चौक येथील व्यावसायिक सुभाष हारणे यांना निर्जन ठिकाणी गाठून त्यांना लुटण्याचा कट म्होरक्या स्वप्नील जाधवसह संजय ऊर्फ माया किरंगेने पाचगाव येथील त्याच्या राहत्या घरात रचल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.व्यावसायिकाच्या उलाढालीची टिपरकडून मिळाली माहिती
व्यावसायिक हारणे यांचा महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील यात्रा, जत्रामध्ये पाळणा उभारण्याचा व्यवसाय आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग मठ परिसरात पाळणा उभारणीसाठी त्यांनी 45 लाखांचा करार केला होता. त्यांच्याकडील आर्थिक उलाढाल मोठी असल्याने त्यांची चित्रदुर्ग-कोल्हापूर मार्गावर सर्रास वर्दळ असल्याची माहिती म्होरक्या स्वप्नील जाधव याला टिपरकडून मिळाली होती. व्यावसायिकाला लुटल्यास किमान दहा ते पंधरा लाखांची रोकड मिळू शकेल, अशीही संशयितांकडे माहिती होती.
तावडे हॉटेलजवळील चौकात रचला लुटीचा प्लॅन
जाधव, संजय किरंगेसह साथीदारांनी व्यावसायिकाला मार्गावर अडवून लुटण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी दोन मोटारींचीही व्यवस्था केली होती. मंगळवारी मध्यरात्री व्यावसायिक हारणे खासगी निमआराम बसमधून कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती संशयितांना मिळाली. त्यानुसार संशयिताांनी पुणे-बंगळूर महामार्गालगत तावडे हॉटेलजवळील चौकात प्लॅन रचला. पहाटे तावडे हॉटेलजवळ उतरून रस्ता ओलांडत असतानाच स्वप्नील जाधव, संजय किरंगेसह पाचजणांनी त्यांना घेरले.तपासणी पथकातील अधिकारी असल्याची बतावणी
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तपासणी पथकातील आम्ही अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. बॅगेची तपासणी करावी लागेल, असे संशयितांनी दरडावले. त्यावर सुभाष हारणे यांनी व्यवसायाच्या उलाढालीतील रोकड असल्याचे सांगताच संशयितांनी त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसविले. तावडे हॉटेल चौकातून मोटार सरनोबतवाडी येथे नेली. त्यांच्याकडील 25 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन त्यांना तोडून दिले. या रकमेसह संशयित पसार झाले.
शहर, जिल्ह्यात नाकेबंदी; शोधासाठी फौजफाटा रस्त्यावर
व्यावसायिक हारणे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात लुटमारीची फिर्याद दाखल करताच पोलिस यंत्रणांची तारांबळ उडाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकरसह अधिकारी, पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळासह गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. निवडणूक आचारसंहितेत महामार्गासह शहरात बंदोबस्त तैनात असताना लुटमारीचा प्रकार घडल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहर, जिल्ह्यात तसेच महामार्गावरही नाकाबंदी करण्यात आली होती. शंभरावर सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले होते.
म्होरक्यासह साथीदारांचे गोव्यातील हॉटेलमध्ये वास्तव्य
संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर मालकाला पथकाने ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित मोटार पाचगाव (करवीर) येथील स्वप्नील ऊर्फ लाल्या जाधवला विक्री केल्याची माहिती निष्पन्न झाली. संशयिताच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेण्यात आला असता त्याचे गोव्यात वास्तव्य दिसून आले. पोलिसांची पथक तातडीने गोव्याला रवाना झाली. संशयिताचे तेथील फुटेजही कोल्हापूर पोलिसांच्या हाताला लागले.
पोलिसांनी केला टोळीचा गोव्यातून पाठलाग
पोलिसांचा शोध सुरू असतानाच संशयित गोव्यातून बाहेर पडले. मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. राधानगरी- कोल्हापूर रोडवर पुईखडी येथे पोलिसांनी संशयिताला गाठले. संजय किरंगेसह अभिषेक लगारे व विजय खांडेकर याच्या पथकाने मुसक्या आवळून त्याच्यावर अटकेची कारवाई केली; तर स्वप्नील जाधव व हर्षद खरात पसार झाले. चौकशीत तिन्हीही संशयितांनी लुटमारीच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचेही तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.