'एक्साईज'च्या अधीक्षकांचा इशारा! हॉटेल- ढाब्यांवर मद्यपान नको,
नाहीतर होईल 25 हजारांपर्यंत दंड; अवैध पार्ट्यांवर 10 भरारी पथकांचे लक्ष
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक, हातभट्टी दारू निर्मिती, परवानगी नसताना ढाबे, हॉटेलवर मद्यपानाची सोय व मद्यविक्री, अशा बाबींवर लक्ष ठेवले जात आहे. कारवाईनंतर मद्यविक्री किंवा मद्यपानाची
सोय करणाऱ्या ढाबा चालकास न्यायालयातून तब्बल २५ हजारांपर्यंत तर
ग्राहकांना एक ते पाच हजारांपर्यंत दंड ठोठावला जातो.
निवडणूक म्हटलं की पैसा, दारूचा महापूर, असेच मानले जाते. याशिवाय ढाब्यांवर, हॉटेलवर पार्ट्याही रंगतात. १५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या काळात सोलापूर ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात सर्वाधिक हातभट्टी दारूच असल्याची स्थिती आहे. गावागावात हातभट्टी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचेही चित्र आहे.
जिल्ह्यातील अनेक तांड्यांवर हातभट्ट्या पेटल्याचेही पोलिस कारवाईतून दिसून आले आहे. दुसरीकडे मद्यविक्री व मद्यपान करण्यास परवानगी नसताना देखील अनेक विशेषत: महामार्गांवरील हॉटेल, ढाब्यांवर तसे प्रकार होतात. निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी, मतदारांवर प्रभाव पडेल असे अवैध कृत्य कोणाकडूनही होणार नाही, यावर जिल्हा प्रशासन कशापद्धतीने लक्ष ठेवणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
नागरिकही देवू शकतात 'या' क्रमांकावरून माहिती
अवैध मद्यविक्री, अवैधरीत्या दारूची वाहतूक, हातभट्टी दारू निर्मिती या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. कोणत्याही नागरिकास अवैध दारूसंदर्भात माहिती असल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. नागरिकांनीही पुढाकार घेतल्यास निश्चितपणे सोलापूर जिल्हा हातभट्टी दारूमुक्त होईल व अवैध धंद्यांनाही आळा बसेल, असा विश्वास अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ढाबे, हॉटेलवर मद्यपान करण्यावर निर्बंध
हॉटेल, ढाबा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी (परमीट बार सोडून) मद्यपान करण्यावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या मद्यविक्री करणाऱ्या किंवा ग्राहकांसाठी मद्यपानाची सोय करून देणाऱ्या ढाबे, हॉटेलवर कारवाई केली जात आहे. ढाबा चालक-मालक व मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना अटक करून न्यायालयात हजर केले जाते. त्याठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते.
- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.