आदानी समूहाचे सर्वेसर्वा तथा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. हिंडेनबर्गनंतर आता त्यांच्यासाठी अमेरिकेतून आणखी एक वाईट बातमी आली आहे. गौतम अदानी यांच्या कंपनीवर अमेरिकेत गंभीर आरोप झाले आहेत. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार दिसत आहे. ही बातमी येताच अदानींचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहेत. एवढेच नाही तर कधी काळी अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर राहणारे अदानी आता थेट 25व्या स्थानावर गेले आहेत.
अमेरिकेतून आलेल्या संबंधित वृत्तानंतर, काही तासांतच अदानी समूहाचे मार्केटकॅप 2.53 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. अदानीच्या शेअरमधील घसरण आणि मार्केट कॅप धडाम झाल्याने गौतम अदानींची संपत्ती काही तासांतच 12 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. भारतीय रुपयांचा विचार करता, अमेरिकेतून आलेल्या या बातमीमुळे गौतम अदानींची 10,13,27,30,32,800 रुपयांची संपत्ती स्वाहा झाली आहे. ही बातमी येण्यापूर्वी गौतम अदानी फोर्ब्स रियल टाइम बिलेनिअर इंडेक्समध्ये 17व्या स्थानावर होते. ते आता 25व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती 12 अब्ज डॉलरने घसरून 57.4 अब्ज डॉलरवर आली आहे.
अदानींच्या शेअरची स्थिती -
अमेरिकेतील गंभीर आरोप आणि वॉरंटच्या बातम्यांमुळे अदानीचे बहुतांश शेअर्स धडाम झाले आहेत. अदानीची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. तर अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे 13 ते 17 टक्क्यांनी घसरले. तर अदानी एनर्जी सोल्युशन 20 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय, ACC 12 टक्क्यांहून अधिक तर अबुंजा सिमेंट 13 टक्क्यांनी घसरला आहे.
गौतम अदानी यांच्यावरील आरोप? -
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप झाले आहेत. अदानी आणि इतर सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. गौतम अदानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह सात जणांवर सौरऊर्जेशी संबंधित करारासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर अथवा सुमारे 2110 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.