सांगली: बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत, राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे 'खरीप बाजरी अभियान' राबवले. यामध्ये माडग्याळ येथील तरुण शेतकरी पांडुरंग सावंत यांनी एकरी जेमतेम 4 क्विंटल उत्पादन येत असलेल्या शेतात तब्बल 43 क्विंटलपर्यंत बाजरीचे उत्पादन घेऊन राज्यात विक्रम केला होता.
याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत सर्वसाधारण गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते सावंत कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आहे. बाजरीच्या भरघोस उत्पादनासाठी पांडुरंग सावंत यांनी शेती आणि पीक पद्धतीत कोणता बदल केला? याबाबत जाणून घेऊयात.
लोकल18 च्या टीमने विक्रमी बाजरी उत्पादक शेतकरी पांडुरंग सावंत यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "40 गुंठे क्षेत्रामध्ये बाजरीचे उत्पादन घेतले होते. आमच्या माडग्याळ गावातील जमिनी खडकाळ आहेत. येथे नेहमीच बाजरी सारखी पिके घेतली जातात. परंतु आमचे वडील जेव्हा पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. तेव्हा या शेतामध्ये फार फार तर 10-12 क्विंटल बाजरी निघत होती.
बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे खरीप बाजरी अभियान राबविले. तेव्हा या अभियानामार्फत माडग्याळ गावामध्ये शेतकऱ्यांचा गट स्थापन करून 25 एकर बाजरी उत्पादनाचा प्रयोग केला. यामध्ये मी देखील सहभागी झालो होतो. ठिबक सिंचनावर बाजरी पिकवण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता.आम्हा बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना पंढरपूर येथे ट्रेनिंग देण्यात आले. त्यानुसार आम्ही ठिबक सिंचनावर बाजरी पिकवली. मी एक एकर क्षेत्रामध्ये टाटा कंपनीचा 7872 हे बाजरीचे वाण वापरले. यामध्ये 43 क्विंटलचे विक्रमी उत्पादन निघाले. यामुळे राज्यपालांचा हस्ते आमचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला," असे त्यांनी सांगितले.
पांडुरंग सावंत हे जत तालुक्यातील माडग्याळ गावचे पदवीधर शेतकरी आहेत. वडील विठ्ठल सावंत यांच्याकडून त्यांना शेतीचा वारसा मिळाला आहे. जत तालुक्यातील दुष्काळ मुक्तीसाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत ते यशस्वी होत आहेत. बाजरीचे विक्रमी उत्पादन घेतल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सावंत कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. जतच्या तरुण शेतकऱ्याचा प्रवास सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतो आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.