Cancer च्या 'या' प्राथमिक लक्षणांकडे कोणाचच लक्ष जात नाही, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव
मुंबई: भारत आणि युनायटेड स्टेट्ससह इतर अनेक देशांमध्ये सर्वांत जास्त मृत्यू हार्ट अॅटॅकने होतात. त्यानंतर कॅन्सरचा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत अनेक देशांना मागे टाकत आहे.
चिंतेची बाब म्हणजे पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर होणारे आजार सध्या भारतात 30 ते 35 वर्ष वयोगटातल्या तरुणांना होत आहेत.
मेडिकल न्यूज टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार केल्याने अनेकांचा जीव वाचू शकतो. त्यासाठी स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाने काही लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या सर्वसाधारण, पण सर्रास दुर्लक्षित होणाऱ्या लक्षणांची माहिती घेऊ या. 'प्रिव्हेन्शन'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हाडं दुखणं:
हाडांमध्ये अचानक होणाऱ्या तीव्र वेदना असोत किंवा नियमित दुखणं असो, हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार, कॅन्सर असेल तर हाडांना सूज येणं किंवा फ्रॅक्चरसारख्या समस्यादेखील जाणवू शकतात.
शरीरावर पुरळ:
शरीरावरचं पुरळ अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचं लक्षण असू शकतं. पुरळ येणं हा ल्युकेमियाचादेखील संकेत आहे. ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर आहे. मेडिकल न्यूज टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, असामान्य रक्त पेशी प्लेटलेट्सच्या उत्पादनात व्यत्यय आणतात. परिणामी ल्युकेमिया असलेल्यांच्या त्वचेवर लहान लाल, जांभळे किंवा तपकिरी ठिपके दिसू शकतात. त्यांना petechiae असं म्हणतात.
डोळे दुखणं:
एनएचएसच्या माहितीनुसार, डोळ्यांमध्ये किंवा आजूबाजूला वेदना होणं, हे डोळ्यांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
वारंवार डोकेदुखी:
अनेकांना काही ना काही कारणाने डोकेदुखी होत असते. मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला डोकेदुखीमध्ये असामान्य पॅटर्न किंवा तीव्रतेत वाढ दिसली तर हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.
छातीत जळजळ:
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने म्हटलं आहे की, वारंवार छातीत जळजळ होणं किंवा जेवल्यानंतर छातीत हळू वेदना जाणवणं ही अन्ननलिकेच्या किंवा पोटाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात.
वेदनादायक पीरियड्स:
बऱ्याच स्त्रियांना अचानक जास्त ब्लिडिंग होतं किंवा मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात. ही एंडोमेट्रियल कॅन्सरची सुरुवात असू शकते, असं मेयो क्लिनिकने म्हटलं आहे.
स्तनाग्रांमध्ये (निपल्स) बदल:
ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होणाऱ्यापूर्वी अनेक स्त्रियांना असं लक्षात आलं आहे की, त्यांची स्तनाग्रं चपटी होतात, उलट किंवा बाजूला वळलेली दिसतात.
स्तनांमध्ये वेदना:
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, स्त्रियांचे स्तन लाल किंवा जांभळे होणं, स्तनांचं तापमान वाढणं, सूज येणं ही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात.
टेस्टिकल्सना सूज येणं:
टेस्टिकल्सला सूज आली आहे, असं जाणवल्यास पुरुषांनी डॉक्टरांकडे जावं. मेडिकल न्यूज टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अशा प्रकारची सूज टेस्टिकल कॅन्सरचा संकेत असू शकतो.
गिळण्यात अडचण येणं:
अन्नपदार्थ किंवा पाणी गिळण्यात अडचण येणं, ही लक्षणं घशाच्या कॅन्सरशी संबंधित आहे. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातदेखील अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. घशावर दाब जाणवणं हेदेखील थायरॉइड कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
अचानक वजन कमी होणं:
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता झपाट्याने वजन कमी होत असेल तर हे आतडं आणि पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
पोट खराब होणं:
सर्वांचं पोट अधूनमधून खराब होतं. ही सामान्य बाब आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या अहवालानुसार, तीव्र क्रॅम्पिंग किंवा ओटीपोटात दुखणं हे कोलोरेक्टल कॅन्सरचे संकेत असू शकतात.
छातीत घरघर जाणवणं:
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांना सर्वांत अगोदर छातीत घरघर जाणवणं, श्वसनास अडथळा येणं अशी लक्षणं जाणवतात. थायरॉइड कॅन्सरमुळेदेखील श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
पोटात गॅस होणं किंवा पोट फुगणं:
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या माहितीनुसार, पोटात गॅस होणं किंवा पोट फुगणं हे पोटाच्या विविध विकारांसह ओव्हरियन आणि कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
आतड्यांसंबंधी समस्या:
तुम्हाला बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या समस्या वारंवार जाणवत असतील तर हा कोलोरेक्टल कॅन्सरचा संकेत असू शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे.
लघवीला त्रास होणं:
कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स ऑफ अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, लघवी करताना त्रास होणं किंवा इच्छा असूनही लघवी बाहेर न पडणं, ही प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
इरेक्शन प्रॉब्लेम्स:
कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स ऑफ अमेरिकाने असं नमूद केलं आहे की, प्रोस्टेट कॅन्सर जसजसा वाढत जातो तसतसं पुरुषांना इरेक्शन प्रॉब्लेम्स येतात. त्यांना कॅन्सर असल्यास सेक्स करताना इरेक्शन होत नाही किंवा ते जास्त काळ टिकवून ठेवणं कठीण जातं.
थकवा येणं:
काही जणांना अत्यंत थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. विविध प्रकारच्या कॅन्सरमुळेसुद्धा थकवा येऊ शकतो.
ताप येणं:
क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, वारंवार ताप येणं हे ल्युकेमियाचं लक्षण असू शकतं. या आजारात आपला बोनमॅरो असामान्य पांढऱ्या रक्तपेशी तयार करतात आणि शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर परिणाम करतात.
नखांवर डाग पडणं:
नखाखाली तपकिरी किंवा काळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके नखांच्या खाली उद्भवणाऱ्या त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.