Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांच्या सुट्ट्या, रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द! पोलिस महासंचालकांचे आदेश; विधानसभा निवडणुकीसाठी होमगार्डसह पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची ड्युटी

पोलिसांच्या सुट्ट्या, रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द! पोलिस महासंचालकांचे आदेश; विधानसभा निवडणुकीसाठी होमगार्डसह पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची ड्युटी
 

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना १५ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्ट्या व रजा मिळणार नाहीत.

पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मंगळवारपासून (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून त्यासाठीही पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ५ ते १८ नोव्हेंबर या काळात प्रचारसभा, कॉर्नर बैठका होतील. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होईल. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, राज्य राखीव पोलिस बलाचेही कर्मचारी असणार आहेत. राज्यातील जवळपास दीड लाख पोलिस, ४७ हजार होमगार्ड व राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्यांनाही विविध ठिकाणी बंदोबस्त दिला जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त असणार असून काही ठिकाणी नवप्रविष्ठ पोलिसांनाही बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचे नियोजन

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार १५ ते २५ नोव्हेंबर या काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या सुट्ट्या, रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

निवडणूक कामात शिक्षकांच्या दिवाळी सुट्ट्या

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी नेमलेल्या सर्वच शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पार पडणार आहे. मतदानाच्या १० ते १२ दिवस अगोदर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दरम्यान, शिक्षकांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी असणार आहे. पण, त्यांना येत्या शनिवार, रविवारी तालुकानिहाय प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा एका प्रशिक्षणाला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्ट्या इलेक्शन कामातच जाणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.