राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे. अशामध्ये विधानसभा निवडणुकीची आणि आचारसंहितेची तारीख कधी जाहीर होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीमने मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात येऊन पाहणी केली. त्यामुळे लवकरच तारीख जाहीर होईल असे म्हटले जात होते. पण आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा १३ ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तर १० ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे.
नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्याशिवाय दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. निवडणूक तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाला तयारी करावी लागते. १२ ऑक्टोबरला शनिवार आणि १३ ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे १३ तारखेनंतर विधानसभा निवडणूक तारीख आणि आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, राज्यात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेची मुदत पूर्ण होत आहे. या मुदती आधी राज्यात विधानसभा निवडणूक होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोग कामाला लागले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणता ४५ दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. अशामध्येच २७ सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली होती.केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम मुंबईत आली होती. या टीमने राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याद्वारे त्यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.राज्यातील विधानसभा निवडणुका निपक्षपाती पार पडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता निवडणूक आणि आचारसंहिता तारखा कधी जाहीर होतात हे पाहणं महत्वाचं राहिल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.