'घर घर संविधान' हा बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान:धर्मपाल मेश्राम
भारतीय संविधानाला ७५ वर्ष झाल्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे 'घर घर संविधान' अभियान राबविण्यात येत आहे.
भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त करीत या महत्वपूर्ण पुढाकाराबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'घर घर संविधान' हा अनोखा सन्मानजनक उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी विविध संघटनांनी देखील श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा समाजाप्रती असलेला सहिष्णूभाव आणि सर्वसमावेशी धोरण यातूनच राज्याला हा बहुमान मिळू शकला आहे, अशी प्रतिक्रीया धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद-विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ 'घर घर संविधान' साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे शासन निर्णय देखील जारी करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे, भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे, कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे, संविधान मूल्य यावर पथनाट्य तयार करणे, शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे, संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा, संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे, प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासन आणि विशेषत: उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि पुढाकाराने अत्यंत स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील घराघरांमध्ये भारतीय संविधानाची महती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रसारीत आणि प्रवाहित होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.